आकोटातून दोन मुली, एका मुलाचे अपहरण
By admin | Published: December 30, 2014 01:10 AM2014-12-30T01:10:08+5:302014-12-30T01:10:08+5:30
आकोट शहर पोलिसांत अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल.
आकोट (अकोला ) शहरातून एक १२ वर्षीय मुलासमवेत दोन मुलींचे अपहरण झाले. या प्रकरणी आकोट शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा प्रल्हाद वानरे (रा. इंदिरानगर) या महिलेने तिच्या १२ वर्षाच्या अभय नामक मुलाला पळवल्याची तक्रार दिली आहे. गीताबाई पोटे विद्यामंदिरात सातव्या वर्गात तो शिकतो. १५ डिसेंबर रोजी कूपनलिका सुरू आहे काय, हे पाहण्याकरिता गेलेला अभय घरी परतला नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर वर्षा वानरे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्या घटनेत अजय रामभाऊ गाडगे (रा. आसरा कॉलनी) यांनी मुलीसह तिची मैत्रिण २८ डिसेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यांची मुलगी भाविका (वय १२) ही तिची मैत्रिण खुशी कल्पेकरसह खेळण्याकरिता गेली होती. त्या दोघीही परत आल्या नाहीत. त्यांना पळवून नेल्याचा संश्य गाडगे यांनी व्यक्त केला. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आकोट शहरातून गेल्या काही दिवसांपासून मुले बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत.