‘सीएसआयआर’अंतर्गत ‘जीएमसी’च्या दोन विद्यार्थ्यांना मिळणार संशोधन प्रशिक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 10:59 AM2019-12-24T10:59:12+5:302019-12-24T10:59:18+5:30
विद्यार्थ्यांना ‘कर्करोग आणि आनुवंशिकशास्त्र’ या विषयावर संशोधन प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वैज्ञानिक व औद्योगिक परिषद म्हणजेच ‘सीएसआयआर’अंतर्गत अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची प्रथमच संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ‘कर्करोग आणि आनुवंशिकशास्त्र’ या विषयावर संशोधन प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी देशभरातून केवळ २० जणांची निवड करण्यात आली.
‘सीएसआयआर’अंतर्गत सेंटर फॉल सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र विभागातर्फे हैदराबाद येथे सोमवार, २३ डिसेंबरपासून या संशोधन प्रशिक्षणाला सुरुवात झाली. आधुनिक जीवशास्त्रातील सीमांत क्षेत्रातील ही एक प्रमुख संशोधन संस्था आहे. या संस्थेतर्फे ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांकडून दरवर्षी अर्ज मागविण्यात येतात. त्यापैकी केवळ २० विद्यार्थ्यांची निवड होते. यंदा अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे पहिल्यांदाच आकाश चौरेवार आणि आयुष गिंदोडिया या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली. हैदराबाद येथे २३ डिसेंबर २०१९ ते ३ जानेवारी २०२० या कालावधीत हे संशोधन प्रशिक्षण चालणार असून, यामध्ये या विद्यार्थ्यांना आनुवंशिकशास्त्र आणि कर्करोग या दोन विषयांवर संशोधनासाठी प्रोत्सहित करण्यात येईल. शिवाय, संशोधन कशा पद्धतीने करावे, याचेही प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने वैद्यकीय क्षेत्रात उच्च स्तरावर संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे.
पदव्युत्तर पूर्व विद्यार्थ्यांच्या संशोधनाच्या पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून ‘सीएसआयआर’अंतर्गत होणारे हे संशोधन प्रशिक्षण महत्त्वपूर्ण आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी योग्य दिशा मिळते. यंदा पहिल्यांदाच जीएमसीच्या दोन विद्यार्थ्यांची यासाठी निवड होणे कौतुकास्पद आहे.
- डॉ. शिवहरी घोरपडे,
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.