हिवरखेड येथील अपहृत दोन चिमुकले सापडले!
By admin | Published: September 14, 2016 02:14 AM2016-09-14T02:14:05+5:302016-09-14T02:14:05+5:30
तेलंगणातील बासर आणि आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे सापडली दोन्ही अपह्रत मुले; हिवरखेड पोलिसांचे पथक रवाना.
हिवरखेड(जि. अकोला), दि. १३ : शहरातील गोधावेस परिसरात राहणार्या विजय पवार (७) व वैभव भागडकर (८) या दोन्ही चिमुकल्यांचे शनिवार १0 सप्टेंबर रोजी अज्ञात इसमाने अपहरण केले होते. ही दोन्ही मुले तेलंगणा येथील बासर, आणि आंध्रप्रदेशातील विजयवाडा, येथे सापडली आहेत. दोन्ही मुलांना ताब्यात घेण्यासाठी हिवरखेड पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.
हिवरखेड शहरातील अपहरण झालेल्या दोन चिमुकल्यांपैकी वैभव भागडकर हा बासर रेल्वे स्टेशन (तेलगंणा) येथे आढळला. त्याला तेथील रेल्वे पोलिसांनी आज ताब्यात घेतले. तर विजय पवार हा सात वर्षीय चिमुकला विजयवाडा या शहरातील रेल्वे स्टेशनवर पोलिसांना मिळाला. विजयवाडा येथील चाइल्ड लाइन कोआरडीनरचे जेकब तसेच बासर रेल्वे पोलीसचे उपनिरीक्षक मनोहर यांनी या चिमुकल्या मुलांचे फोटो व माहिती व्हॉट्स अँपवर पाहून अकोला पोलीस, हिवरखेडचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्याशी संपर्क साधला. ही चिमुकले हिवरखेड येथील असल्याची खात्री केल्यानंतर हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस पथक राजेश भगत, अमोल पवार हे दोन्ही मुलांना ताब्यात घेण्यासाठी आज रवाना झाल्याची माहिती ठाणेदार कात्रे यांनी दिली.