राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत दोन ठार, एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 16:53 IST2022-04-14T16:52:56+5:302022-04-14T16:53:30+5:30
Two killed, one seriously injured : बाळु ठाकरे (४०, रा. वाशिंबा) व मंगलसिंग डाबेराव (४०, रा. वाशिंबा) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत दोन ठार, एक गंभीर जखमी
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिंबानजीकच्या नवीन बायपासजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत एका दुचाकीवरील दोन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. १४ एप्रिल) दुपारी घडली. बाळु ठाकरे (४०, रा. वाशिंबा) व मंगलसिंग डाबेराव (४०, रा. वाशिंबा) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिंबा येथील बाळू लखडुजी ठाकरे, मंगलसिंग लक्ष्मण डाबेराव व देवानंद अमरसिंह डाबेराव हे तीघे एम. एच. ३० बी एफ २४५३ क्रमांकाच्या मोटारसायकलद्वारे बोरगाव मंजू येथून वाशिंबा येथे जात होते. यावेळी अकोल्याहून मुर्तीजापूरकडे जाणारा एम एच ३० ए आर ०७०० क्रमांकाच्या ट्रकने नवीन बायपासजवळ दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये मंगलसिंग डाबेराव यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या बाळू ठाकरे व देवानंद डाबेराव यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिाकणी बाळू ठाकरे यांचा मृतयू झाला, तर देवानंद डाबेराव यांच्यावर उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील सोळंके, हेड कॉन्स्टेबल भाऊराव हातोले, अब्दुल फईम शेख संजय इंगळे, मंगेश इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी दाखल केले. घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला होता. बोरगाव मंजू पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके सह पोलीस करत आहेत,