दोन कि.मी. चिखल तुडवीत गुरुजी दाखवितात ज्ञानाची वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:23 AM2021-09-05T04:23:52+5:302021-09-05T04:23:52+5:30

बबन इंगळे बार्शीटाकळी : सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार असलेले शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी अनेक संकटांचा सामना करून जीवनाशी व डोळ्यासमोर ...

Two km Walking through the mud, Guruji shows the way to knowledge! | दोन कि.मी. चिखल तुडवीत गुरुजी दाखवितात ज्ञानाची वाट!

दोन कि.मी. चिखल तुडवीत गुरुजी दाखवितात ज्ञानाची वाट!

Next

बबन इंगळे

बार्शीटाकळी : सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार असलेले शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी अनेक संकटांचा सामना करून जीवनाशी व डोळ्यासमोर असलेल्या परिस्थितीशी संघर्ष करीत शिक्षण घेणाऱ्यांची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात, परंतु शिक्षण देण्यासाठी शिक्षक कोणकोणत्या संकटांना तोंड देत ज्ञानाचे धडे देतात, याबाबतचा अनुभव मोजकाच असतो. दोन शिक्षक शासकीय नोकरी करताना ४० कि. मी.चा वाहन प्रवास आणि दोन कि. मी.चा चिखल तुडवित पायी प्रवास करून शाळेत येऊन विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देतात.

बार्शीटाकळी तालुक्यातील दुर्गम भागातील १९९९ मध्ये वसलेले जुनी धामणदरी ३० ते ३५ घरांची वस्ती असलेले गाव. या गावाला अजूनही कोणताही महसुली रस्ता नाही. वाटेल तेथून जंगलातून वाट काढीत दोन कि. मी. पायी जावे लागते. येथील जि. प. शाळेमध्ये वर्ग १ ते ४ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मुख्याध्यापक सुधाकर ढगे व सहायक शिक्षक राजेश तायडे यांच्यावर जबाबदारी आहे. गावाचा रस्ता पाहून कोणताही शिक्षक येथे येण्यास तयार नसतो, परंतु या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेता यावे, त्यांचा प्राथमिक पाया मजबूत व्हावा या हेतूने अत्यंत कठीण वाट पार करून दैनंदिन हे शिक्षक शाळेवर येतात. दोन्ही शिक्षक शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध कलागुणात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडतात. अशा या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना खरतड मार्गाने प्रवास करून ज्ञानाची वाट दाखविणाऱ्या शिक्षकांचा आदर्श घेण्याजोगा आहे.

--------------------

अशी बनली ओळख वस्ती शाळा ते जि. प. शाळा

जुनी धामणदरी येथे १ जुलै २००४ मध्ये ताट्याचा आडोसा लावून वस्ती शाळा सुरू केली. गावातीलच संतोष कांबळे या ध्येयवेड्या शिक्षकाने ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या एक हजार रुपये प्रति महिना मानधनावर २८ विद्यार्थ्यांना घेऊन वस्तीशाळा सुरू केली होती. यानंतर २०१४ मध्ये राज्यातील वस्तीशाळा यांचा शासनाने जि. प.मध्ये समावेश केला. तेव्हापासून येथील शाळा केशव नगर जि. प. शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली.

Web Title: Two km Walking through the mud, Guruji shows the way to knowledge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.