दोन लाखांवर शेतक-यांना मिळू शकते कर्जमाफी
By admin | Published: June 5, 2017 02:14 AM2017-06-05T02:14:07+5:302017-06-05T02:14:07+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविली शासनाकडे माहिती.
संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पाच एकरापर्यंंत जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर शासनामार्फत जिल्हानिहाय अल्पभूधारक शेतकर्यांची माहिती मागविण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातील अल्पभूधारक शेतकर्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रविवारी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हय़ातील दोन लाखांवर अल्पभूधारक शेतकर्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे.
शेतकर्यांनी पुकारलेल्या संपादरम्यान, राज्यातील पाच एकरापर्यंत शेतजमीन असलेल्या आणि कर्ज थकीत असलेल्या अल्पभूधारक शेतकर्यांचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जून रोजी केली. त्यानुषंगाने शासनामार्फत राज्यातील जिल्हानिहाय अल्पभूधारक शेतकर्यांची माहिती मागाविण्यात आली आहे. त्यानुसार अकोला जिल्हय़ातील अल्पभूधारक शेतकर्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ४ जून रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. जिल्हय़ातील सातही तालुक्यांत पाच एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकर्यांची संख्या २ लाख ३५ हजार ९४९ आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ातील दोन लाखांवर अल्पभूधारक शेतकर्यांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
जिल्हय़ात असे आहेत अल्पभूधारक शेतकरी!
तालुका शेतकरी
अकोला ५६९४0
बाळापूर २५६५७
पातूर २१६७२
मूर्तिजापूर ३४0१३
बाश्रीटाकळी २८८३३
अकोट ३९३४0
तेल्हारा २९४९४
एकूण २३५९४९
शासनाच्या आदेशानुसार, जिल्हय़ातील पाच एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकर्यांची माहिती अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.
- श्रीकांत देशपांडे,
निवासी उपजिल्हाधिकारी.