दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाखांची रोकड उडवली!
By नितिन गव्हाळे | Published: October 30, 2023 07:57 PM2023-10-30T19:57:53+5:302023-10-30T19:58:01+5:30
किराणा बाजारातील घटना, चोरट्यांनी पाठलाग करून केली चोरी
अकोला: शहरातील हॉटेल व्यावसायिकाला प्लॉट विक्रीसाठी टोकन दिलेले दाेन लाख रूपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. त्यांची पाठ वळताच, दोन चोरट्यांनी डिक्कीतून दोन लाखांची रोकड लंपास केली आणि पळून गेले. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास किराणा बाजारात घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
लकंडगंजमधील गुलशन कॉलनीत राहणारे शेख इस्माइल शेख छोटू(४९) यांच्या तक्रारीनुसार ते हॉटेल व्यवसायी असून, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता रयत हवेली येथे आले. त्यांना एकाकडून प्लॉट विक्रीचे टोकन म्हणून दोन लाख रूपये घ्यायचे होते. तेथे इम्रान खान हफिजखान याच्याकडून पैसे घेतल्यानंतर त्यांनी ते पैसे दुचाकीच्या डिक्कीत ठेवले.
त्यानंतर ते मोहम्मद अली चौक व तेथून किराणा बाजारात आले. किराणा बाजार येथे त्यांनी दुचाकी उभी केली आणि ते दुकानात आटा आणण्यासाठी गेले असता, गाडीचे डिक्कीत ठेवलेले पैसे कोणीतरी अज्ञात इसमांनी काढून घेतले. दरम्यान बाजुला असलेल्या एका हमालाने त्यांना आवाज देऊन दोघेजण डिक्कीजण रोकड घेऊन पळून जात असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी व हमालाने गाडीचा पाठलाग केला. परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.