इंग्रजी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी दोन लाखांवर आॅनलाइन अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:26 PM2019-03-23T13:26:52+5:302019-03-23T13:26:57+5:30
२२ मार्चपर्यंत राज्यभरातून तब्बल २ लाख १३ हजार २0४ पालकांनी आरटीईच्या पोर्टलवर आॅनलाइन अर्ज केले आहेत.
अकोला: दुर्बल व वंचित घटकांमधील पाल्यांचे इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमधील ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहे. २२ मार्चपर्यंत राज्यभरातून तब्बल २ लाख १३ हजार २0४ पालकांनी आरटीईच्या पोर्टलवर आॅनलाइन अर्ज केले आहेत. २२ मार्च ही आॅनलाइन अर्ज करण्याची अखेरची तारीख होती; परंतु विविध संघटना, पालकांच्या आग्रहास्तव शिक्षण विभागाने आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी ३0 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारी अधिनियम २00९ नुसार यंदा २0१९-२0 या शैक्षणिक वर्षासाठी दुर्बल व वंचित घटकामधील पालक इंग्रजी व मराठी माध्यमाच्या नामांकित शाळांच्या २५ टक्के राखीव जागांसाठी पाल्यांचे आॅनलाइन अर्ज भरत आहेत. राज्यात आरटीई अंतर्गत ९ हजार १९४ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत एकूण १ लाख १६ हजार ७६५ जागा राखीव आहेत. या राखीव जागांसाठी शिक्षण विभागाने ५ मार्चपासून आॅनलाइन अर्ज मागविले होते. त्यासाठी २२ मार्चपर्यंत पालकांना मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत राज्यातील २ लाख १३ हजार २0४ पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. आॅनलाइन प्रवेशामध्ये भाडे करारनामाचा अडथळा येत असल्यामुळे पालक त्रस्त झाले आहे. त्यामुळे पालकांसह विविध संघटनांनी आरटीईच्या राखीव प्रवेश जागांवरील आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाने २0 मार्च रोजी पत्र काढून पालकांना आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी ३0 मार्चपर्यंत मुदत वाढविली आहे. (प्रतिनिधी)