वृद्धेचे दागिने लंपास करणारे दोघे गजाआड
By admin | Published: June 17, 2016 02:41 AM2016-06-17T02:41:48+5:302016-06-17T02:41:48+5:30
चोरट्यांकडून दागिने जप्त, दोन दिवसांची पोलीस कोठडी
अकोला: बाळापूर येथून ऑटोरिक्षाने कान्हेरी गवळी येथे जाणार्या वृद्धेच्या बॅगेतील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ९१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुरुवारी अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून ८0 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. न्यायालयाने आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कान्हेरी गवळी येथील कमलाबाई महादेव सुळकर (६३) या १४ जून रोजी रात्रीच्या सुमारास बाळापूर बस स्टँडहून कान्हेरीकडे जाण्यासाठी ऑटोरिक्षामध्ये बसल्या. त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी काढून घेतली. कमलाबाईने बाळापूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी माहितीच्या आधारे जुने शहरातील भागवतवाडीत राहणारे अब्दुल वहीद अब्दुल शहीद(४५) आणि सैयद वसीम सैयद रहीम(३४) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्हय़ाची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ८0 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद काळे, हवालदार अशोक चाटी, शिपाई शेख हसन, रवि इरचे यांच्या पथकाने केली.