पिंपळखुटा परिसरात शॉक लागून दोन बिबट्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:16+5:302020-12-25T04:15:16+5:30
नासिर शेख खेट्री : पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत पिंपळखुटा शेतशिवारात विद्युतप्रवाह असलेल्या खांबाचा शॉक लागून दोन बिबट्यांचा ...
नासिर शेख
खेट्री : पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत पिंपळखुटा शेतशिवारात विद्युतप्रवाह असलेल्या खांबाचा शॉक लागून दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गावासह परिसरात एकच खळबळ उडाली. विद्युत खांबाच्या बाजूला मुंगूसही मृतावस्थेत आढळून आल्याने मुंगुसाची शिकार करण्यासाठी बिबटे शेतात घुसल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे. विद्युत खांबाच्या बाजूला मुंगूसही मृतावस्थेत आढळून आल्याने मुंगुसाची शिकार करण्यासाठी बिबटे शेतात घुसल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे.
नितीन जगन्नाथ खरप यांच्या शेतातील विद्युतप्रवाह असलेल्या लोखंडी खांबाचा शॉक लागून दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. गावातील लहान मुले जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले असता, दोन बिबट विद्युत खांबाजवळ दिसून आल्याने लहान मुलांनी आरडाओरड केली. जवळच्या शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी लाठ्या-काठ्या घेऊन त्या ठिकाणी धाव घेतली असता दोन बिबटांचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. ही घटना २३ डिसेंबर रोजी रात्री घडल्याचा अंदाज गावकऱ्यांनी वर्तविला आहे. या घटनेमुळे पिंपळखुटा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच आलेगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे ताफ्यासह घटनास्थळ गाठले. मृत्यू झालेल्या बिबट्यांचा त्यांनी पंचनामा केला.
........................
चार महिन्यांपासून बिबट्याची होती दहशत
पिंपळखुटा चांगेफळ परिसरात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून दहशत पसरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात रात्रीच्या वेळी जाण्याचे टाळले होते. या घटनेची माहिती हाेताच परिसरातील ग्रामस्थांनी बिबट पाहण्यासाठी तुंबळ गर्दी केली होती.
.......................
बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाचे अपयश
पिंपळखुटा चांगेफळ परिसरात गेल्या चार महिन्यांत बिबट्याने रात्रीच्या वेळी अनेक जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत, परंतु वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यास यश आले नाही.
....................
खांबात अनेक दिवसांपासून होता विद्युत प्रवाह
पिंपळखुटा परिसरातील नितीन जगन्नाथ खरप यांच्या शेतातील लोखंडी विद्युत खांबात गेल्या काही दिवसांपासून विद्युत प्रवाह होता. याबाबत संबंधित विभागाला माहितीही देण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सस्ती वीज उपकेंद्राच्या भाेंगळ कारभारामुळे ही घटना घडल्याचा आराेप गावकऱ्यांमधून हाेत आहे.