कृषी केंद्र संचालकास २९ लाखांच्या दंडासह दोन महिन्यांचा कारावास
By राजेश शेगोकार | Published: April 24, 2023 04:50 PM2023-04-24T16:50:52+5:302023-04-24T16:50:58+5:30
मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुनावणी करीत, संबंधित कृषी केंद्र संचालकास २९ लाखांच्या दंडासह दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
अकोला :कीटकनाशक कंपनीकडून माल खरेदी केल्यानंतर कृषी केंद्र संचालकाने दिलेला धनादेश अनादर झाल्यामुळे कंपनीने न्यायालयात खटला दाखल केला. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुनावणी करीत, संबंधित कृषी केंद्र संचालकास २९ लाखांच्या दंडासह दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
नाशिक येथील अडव्हॉन्स पेस्टिसाइड कीटकनाशक कंपनीकडून गिरी फर्टिलायझर रा. मेदनीपुर, कलकत्ता यांनी किटकनाशकाची उधारीत खरेदी केली होती. त्या रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने फिर्यादी कंपनीला दिलेला धनादेश न वठविता परत आल्याने कंपनीने मुख्य न्यायदंडाधिकारी अकोला यांच्या समक्ष कलम १३८ प्रमाणे प्रकरण दाखल केले.
६ वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांचे पुरावे व युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी गिरी फर्टिलायझर यांच्या संचालकास दोन महिने सश्रम कारावासासह २९ लाख दंड, व दंड न भरल्यास एक महिना अधिकचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात फिर्यादी कंपनीकडून ॲड. मनमोहन डी. सारडा यांनी बाजू मांडली.