आणखी दोन कोरोनामुक्त, नव्या रुग्णाची भर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:23 AM2021-09-06T04:23:28+5:302021-09-06T04:23:28+5:30
मे व जून महिन्यात उच्चतम पातळीवर असलेली कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरली असून, गत दोन महिन्यांपासून एकेरी आकड्यात ...
मे व जून महिन्यात उच्चतम पातळीवर असलेली कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरली असून, गत दोन महिन्यांपासून एकेरी आकड्यात रुग्ण आढळून येत आहेत. सप्टेंबरमध्येही हाच कल सुरू असून, पहिल्या पाच दिवसांत केवळ पाच नव्या रुग्णांची भर पडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २७३ अहवाल प्राप्त झाले असून, हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. शनिवारी दिवसभरात करण्यात आलेल्या ३१४ रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. त्यामुळे गत चोवीस तासात एकही नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.
१६ ॲक्टिव्ह रुग्ण
रविवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ५७,८२६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी ११३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ५६,६७४ जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्या १६ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.