अकोल्यात आणखी दोन पॉझिटिव्ह; कोरोनाबाधित रुग्णाची पत्नी, दुकानातील कामगारालाही लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 11:23 AM2020-04-28T11:23:19+5:302020-04-28T11:34:48+5:30
रुग्णाची पत्नी आणि त्याच्या प्रतिष्ठानात कार्यरत असलेल्या एका कामगारासही या कोविड-१९ आजाराची लागण झाल्याचे मंगळवारी समोर आले.
अकोला : जगभर थैमान घालणाºया कोरोना विषाणूने आता अकोला शहरात चांगलेच बस्तान मांडले असून, रविवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या सिंधी कॅम्प परिसरातील एका रुग्णाची पत्नी आणि त्याच्या प्रतिष्ठानात कार्यरत असलेल्या एका कामगारासही या कोविड-१९ आजाराची लागण झाल्याचे मंगळवारी समोर आले. या दोघांचेही कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आले. हे दोन रुग्ण वाढल्यामुळे कोरोनाबाधीतांचा पॉझिटिव्ह आकडा ९ झाला आहे. दरम्यान, बैदपुरा भागातील एका तीन वर्षीय बालकाचा फेरतपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चिंता वाढली आहे.
सिंधी कॅम्पमधील ४१ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले होते. त्यानंतर या रुग्णाच्या निकटसंपर्कातील व्यक्तींची आरोग्यविभागाकडून तपासणी करण्यात आली. त्यापैकी या व्यक्तीची पत्नी आणि त्याच्या दुकानातील कामगार ३१ वर्षीय युवक (न्यू भीमनगर) या दोघांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी एकून ४२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी तीन पॉझिटिव्ह असून, ३९ अहवाल निगेटिव्ह आहेत. तीन पॉझिटिव्ह अहवालात बैदपुराभागातील एका तीन वर्षीय बालकाचा फेरतपासणीच्या अहवालाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह अहवालांची संख्या १९ झाली असून, प्रत्यक्षात सद्या नऊ जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.