अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी दोघांची हत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:00 AM2020-05-29T10:00:21+5:302020-05-29T10:00:39+5:30
हाणामारीत जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
शिर्ला: नळाचे पाणी भरण्यावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना अंबाशी येथे १८ मे रोजी घडली. हाणामारीत जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांच्या १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अंबाशी गावामध्ये २८ मे रोजी सार्वजनिक नळावर फिर्यादी मंदा सोनू तेलगोटे या पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. तेथे अगोदरच आरोपी महिलांचे नंबर सुरू होते. फिर्यादीने पाणी भरण्यासाठी विनंती केली असता बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याप्रकरणी पातूर पोलिसांत मंदा तेलगोटे यांच्या तक्रारीवरून रूपेश सुरेश सरकटे, आकाश सुरेश सरकटे, आकाश अशोक वानखडे, जया विश्राम सरकटे, भाग्यश्री राजेश खंडारे व निशा आकाश वानखडे यांच्याविरुद्ध पातूर पोलिसांनी भादंवि कलम १४३, १४६, १४७, १४८, १४९, ३०७, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वच आरोपींना पातूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी कळविले आहे. या हाणामारीत बाळू सदाशिव मोहाळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी कलम ३०२ ची वाढ केली. दुसऱ्या गटातील फिर्यादी निशा आकाश वानखडे रा. नांदखेड हल्ली मुक्काम अंबाशी या गावातील सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी फिर्यादी, तिची बहीण आणि आईला आरोपी सोनू नाजूकराव तेलगोटे, मंदा सोनू तेलगोटे, बाळू मोहाळे, बलदेव मोहाळे, देवराव मोहाळे, विजय मोहाळे, नेहा बलदेव मोहाळे व विजयमाला सहदेव मोहाळे सर्वांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ केली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी भादंवि कलम ३२६, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.
दोन तासांत आरोपी गजाआड : गुन्हा दाखल
बोरगाव मंजू : क्षुल्लक कारणावरून एकाची गळा आवळून हत्या केल्याची घटना २८ मे रोजी बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात उघडकीस आली. संजय श्रीधर धुळधर असे मृतकाचे नाव आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता, संजय धुळधर असे मृतकाचे नाव समोर आले. धुळधर यांची हत्या करून मृतदेह रात्रीच्या दरम्यान भाजी बाजारात सोडून अज्ञात आरोपी पसार झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज होता. यावेळी ठाणेदार हरीश गवळी यांनी तपासाची चके्र फिरवून आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी सुगावा लागताच सदर आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता नागेश सरकटे याने खून केल्याची कबुली दिली. दारूच्या नशेत मृतक व नागेश यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानंतर नागेशने दुपट्ट्याने गळा आवळून खून केला. याप्रकरणी धनंजय धुळधर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नागेश सरकटेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हेकॉ दीपक कानडे, भागवत कांबळे व योगेश काटकर यांनी आरोपीस अटक केली. घटनास्थळावर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारी, ठसे तज्ज्ञ, श्वानास पाचारण केले होते. दरम्यान, पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, ठाणेदार हरीश गवळी यांच्यासह पोलीस करीत आहेत.