विदर्भात दोन नवीन शासकीय कृषी महाविद्यालयांना तत्त्वता मान्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 01:33 PM2018-09-09T13:33:21+5:302018-09-09T13:35:18+5:30
प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाकडे पाठविला असून, शासनाने दोन महाविद्यालयांना तत्त्वता मान्यता दिली आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला : कृषी अभ्यासक्रमाला व्यावसायिक दर्जा प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांचा कल या अभ्यासक्रमाकडे वाढला; परंतु शासकीय महाविद्यालयांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी येत आहेत. याच अनुषंगाने विदर्भात चार शासकीय पदवी कृषी महाविद्यालय देण्यात यावे, यासाठीचा प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाकडे पाठविला असून, शासनाने दोन महाविद्यालयांना तत्त्वता मान्यता दिली आहे.
विदर्भात सात शासकीय तसेच २८ खासगी कृषी महाविद्यालये आहेत. दुसरीकडे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. यावर्षी राज्यात एक लाखावर विद्यार्थ्यांनी कृषी पदवीसाठी अर्ज भरले होते. पण, खासगी वगळता शासकीय कृषी महाविद्यालये कमी असून, विदर्भात तर केवळ ही संख्या सात आहे. त्यामुळे विदर्भात केवळ २,३५० विद्यार्थी प्रवेश क्षमता असल्याने विद्यार्थ्यांना पर्याय निवडावे लागत आहेत. कृषी व्यावसायिक अभ्यासक्रम असल्याने यावर्षी राष्टÑीय प्रवेश पात्रता (नीट) पूर्व परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात आला. ५५ टक्केपर्यंत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थीच प्रवेशासाठी पात्र ठरल्याने, कृषी विद्यार्थ्यांकडे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी येत आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांची कृषी या विषयाला पहिली पसंती असते. याच अनुषंगाने अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने चार कृषी महाविद्यालये मिळावीत, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. यातील यवतमाळ येथे अन्न व तंत्रज्ञान अभियांत्रिकी, तर मूल येथे कृषी महाविद्यालयासाठीची तत्त्वता मान्यता शासनाने दिली. यासंदर्भातील परिपत्रक लवकरच निघणार आहे. वािशम व बुलडाणा येथे प्रत्येकी एक शासकीय कृषी महाविद्यालयाची गरज असल्याने यासंदर्भातील पाठवलेला प्रस्तावही मान्य करण्यात आला. आता प्रत्यक्षात महाविद्यालय केव्हा सुरू होते, याकडे विदर्भातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. याच अनुषंगाने चार शासकीय महाविद्यालांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यातील दोन महाविद्यालयांना तत्त्वता मान्यता मिळाली असून, इतर दोन महाविद्यालयही देण्याचे शासनाने मान्य केले आहे.
डॉ. विलास भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.