व्यक्तिमत्त्व विकासासाठी नववीला दोन नवीन विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:43 AM2017-07-18T01:43:01+5:302017-07-18T01:43:01+5:30
स्व-विकास व कलारसास्वादचा अभ्यासक्रमात समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता नववीसाठी स्व-विकास व कलारसास्वाद हा नवीन विषय सुरू केला आहे. कला, कार्यानुभव, व्यक्तिमत्त्व विकास, आयसीटी हे विषय बंद करू हा नवीन विषय सुरू करण्यात आला आहे.
नववी, दहावीच्या माध्यमिक स्तरावर यापुढे कला विषयाला सन्मानाचे स्थान प्राप्त होत आहे. पूर्वी केवळ कार्यशिक्षण विषयातील अनेक विषयांपैकी हा एक वैकल्पिक विषय होता. आता हा अनिवार्य विषय करण्यात आला आहे. या विषयाला चालू वर्षी नववीच्या वर्गासाठी लागू करण्यात आले असून, पुढील वर्षी दहावीसाठी लागू करण्यात येणार आहे. आठवड्याला दोन तासिका देण्यात आलेल्या या विषयाच्या अभ्यासक्रमाची रचना विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक संपन्न करण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाची योग्य दिशा मिळावी, स्व-जाणीव निर्माण व्हावी आणि विविध अनुभवांद्वारे कलात्मक बाबींमधून आनंद घेऊन जीवन समृद्ध करण्यासाठी विविध क्षमतांचा विकास होण्यासाठी त्याला कलात्मक दृष्टी प्राप्त करून देणे हा या विषयाचा प्रमुख उद्देश आहे.
बालभारतीने या विषयाचे सुंदर पुस्तक बनविले असून, ते या आठवड्यात बाजारात सर्वत्र उपलब्ध होईल.
पुस्तकात एकूण नऊ प्रकरणे आहेत. विशेषत: दृष्य कला व प्रयोगजीवी कला यावर आधारित कृतीयुक्त शिक्षणावर भर देण्यात आला आहे. मुलांनी मुक्तपणे अभिव्यक्त व्हावे आणि त्यातून स्व-निर्मितीचा, कला निर्मितीचा निखळ आनंद घ्यावा ही बाब येथे महत्त्वाची आहे. येथे विद्यार्थ्यांच्या कला निर्मितीचे दर्जानुसार मूल्यमापन न करता तो जे काही निर्माण करणार आहे त्यातून कलारसास्वाद घेण्याची दृष्टी प्राप्त करून देण्याचे काम कलाशिक्षकांना करावयाचे आहे. बाल मानसशास्त्र आणि मेंदूद्वारे होणारी शिक्षण प्रक्रिया याचाही अंतर्भाव अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. विविध प्रकारच्या ४० क्षमतांचा विकास या अभ्यासक्रमातून अपेक्षित आहे. या विषयाला लेखी परीक्षा नसून, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या नोंदी ठेवायच्या आहेत.
दरम्यान, या आठवडाभरात तालुका स्तरावर या विषयाचे प्रशिक्षण होईल. राज्य स्तरावर प्रशिक्षण घेऊन आलेले तज्ज्ञ सर्वांना प्रशिक्षण देतील. विशेष करून कलाशिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आल्यास या विषयाला आणि विद्यार्थ्यांना निश्चित योग्य न्याय मिळेल, अशी माहिती मुख्याध्यापक गजानन चौधरी यांनी दिली.