‘जीत कुने डो’वर्ल्ड कप स्पर्धेत अकोल्याच्या दोन खेळाडूंना सुवर्ण
By रवी दामोदर | Published: March 16, 2024 07:05 PM2024-03-16T19:05:38+5:302024-03-16T19:06:37+5:30
थायलंड येथील फुकेट येथे झालेल्या ‘जीत कुने दो’ वर्ल्डकप स्पर्धेसाठी अकोल्याच्या दोन खेळाडूंनी स्थान मिळविले होते.
अकोला: थायलंड येथील फुकेट येथे झालेल्या ‘जीत कुने दो’ वर्ल्डकप स्पर्धेसाठी अकोल्याच्या दोन खेळाडूंनी स्थान मिळविले होते. या स्पर्धेत दोघांनीही उत्कृष्ट प्रदर्शन करून सुवर्ण पदकावर नाव कोरले. स्पर्धेमध्ये जगभरातील स्पर्धक सहभागी झाले होते. जीत कुने दो ऑल इंडिया फाउंडेशन, आंतरराष्ट्रीय थाई टुरिझम मंत्रालय, थायलंड जित कुने दो महासंघ, वर्ल्ड मार्शल आर्ट फेस्टिव्हल, तथा जागतिक जित कुने दो फेडरेशन उजबेकिस्तान या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या संयुक्त विद्यमाने थायलंडच्या फुकेट येथे दि. ९ ते १६ मार्च दरम्यान सपान हिल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये ६ वी आंतरराष्ट्रीय थाई वर्ल्ड मार्शल आर्ट फेस्टिवल आयोजित केला होता. त्यामध्ये ‘जीत कुने डो’स्पर्धा पार पडली.
स्पर्धेमध्ये अकोल्यातील शिवाजी जित कुने दो अकॅडमी व वंडर किड्झचे खेळाडू अंशुल दिलीप भालतिलक व तोषित अरविंद गुलवाडे हे सहभागी झाल्याची माहिती प्रशिक्षक शिवाजी चव्हाण यांनी दिली. या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करून सुवर्ण पदक जिंकून जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकविले आहे. स्पर्धेत इंग्लंड, रशिया, उझबेकिस्तान, थायलंड, इंडोनेशिया देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. खेळाडूंना शिवाजी तायकांडो अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक तथा महाराष्ट्र तायकांडो असोसिएशनचे सहसचिव शिवाजीराव चव्हाण, पवन झोल, सुरज मेंगे, कुंदन लहाने, सौम्या लोढा, आशिष कसले, योगाचार्य चंद्रकांत अवचार, गुणवंत जानोरकर आदींचे मार्गदर्शन लाभले.