गर्भपाताचे औषध विकणारे दोेघे कारागृहात
By admin | Published: April 13, 2017 01:56 AM2017-04-13T01:56:08+5:302017-04-13T01:56:08+5:30
अकोला- महिलेने दिलेल्या माहितीवरून खदान पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने परभणीतील एका मेडिकल संचालकाला अटक केली. दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली.
अकोला : खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका डॉक्टरकडे आया म्हणून काम करीत असलेल्या महिलेला गर्भपाताच्या किट्सची खरेदी-विक्री करताना अटक केल्यानंतर या महिलेने दिलेल्या माहितीवरून खदान पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने परभणीतील एका मेडिकल संचालकाला अटक केली. दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली.
अकोला येथे दोन दिवसांपूर्वी जप्त करण्यात आलेल्या गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या अवैध औषध साठ्याचे धागेदोरे परभणी जिल्ह्यातील मानवतपर्यंत असल्याचे खदान पोलीस आणि अकोला अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईनंतर उघड झाले आहे. खदान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मेहरुन्नीसा नामक आयाने दिलेल्या माहितीवरून खदान पोलिसांचे एक पथक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रविवारी परभणी जिल्ह्यात गेले.
या महिलेचे कनेक्शन असलेल्या परभणीतील मानवतमधील ‘ढमढेरे मेडिकल’मधून गर्भपाताच्या औषधांची अवैधरीत्या विक्री करण्यात येत होती.
सदर महिलेला गर्भपाताच्या किट्स खरेदी करण्यासाठी बनावट ग्राहक म्हणून ‘ढमढेरे मेडिकल’मध्ये पाठविण्यात आले. ढमढेरे मेडिकलच्या संचालकाने गर्भपाताच्या किट्सची विक्री केली. यावरून खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाक ून मेडिकल संचालकास रंगेहात अटक केली.
महिला व मेडिकल संचालकाविरुद्ध परभणीत गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अकोल्यात आणले असून, त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
बुधवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली.