सिमेंट काँक्रिट मार्ग पूर्ण होण्याआधीच दोन रस्ते उखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 01:24 PM2019-06-28T13:24:51+5:302019-06-28T13:26:49+5:30
अकोला : शहरातील सिमेंट काँक्रिट मार्ग अजून पुढच्या टोकापर्यंत पूर्णदेखील झाले नाही तोच, दोन मार्ग अक्षरश: उखडले आहेत.
अकोला : शहरातील सिमेंट काँक्रिट मार्ग अजून पुढच्या टोकापर्यंत पूर्णदेखील झाले नाही तोच, दोन मार्ग अक्षरश: उखडले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून शासनाने शहरात अनेक मार्गांची निर्मिती केली; मात्र भ्रष्ट अधिकारी-कंत्राटदारांमुळे शासनाचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेला आहे. सुरुवातीच्या पावसाने सार्वजनिक बांधकाम आणि कंत्राटदारांचे पितळे उघडे पाडल्याने अकोलेकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जिल्हा प्रशासनाने शहरातील आठ रस्त्यांचे सोशल आॅडिट केले होते. त्याप्रकरणी पुढील कारवाई अकोला महापालिकेला करायची होती; मात्र महापालिका प्रशासनने अद्याप चुप्पी साधलेली आहे. जनतेच्या रकमेचा दुरुपयोग करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
मागील दोन-अडीच वर्षांपासून अकोल्यात सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे बांधकाम धूमधडाक्यात सुरू झाले. शहरात एकाच वेळी अनेक रस्त्यांचे काम सुरू झाल्याने अकोलेकरांमध्ये उत्साह होता; मात्र हा उत्साह फार काळ टिकला नाही. शहरातील सिटी कोतवाली ते शिवाजी पार्क आणि नेहरू पार्क ते तुकाराम चौक या दोन प्रमुख मार्गांचे बांधकाम अद्याप पूर्णदेखील झाले नाही, तर रस्ता उखडण्यास सुरुवात झाली आहे. पैकी सर्वात निकृष्ट म्हणून सिटी कोतवाली ते शिवाजी पार्कचा टिळक मार्ग सिद्ध होत आहे. या मार्गाचे दोन तुकडे मध्येच सोडले असून, चौपदरीऐवजी अनेक ठिकाणी तीन पदरी मार्ग तयार झाला आहे. गवळीपुरा-मनकर्णा प्लॉटकडे जाणारा मार्ग अजूनही तीन पदरीच झाला आहे. तसेच मानेक टॉकीजसमोरच्या ६० फूट अंतराचा मार्ग अक्षरश: वाहून गेला आहे. अग्रसेन चौक ते दुर्गा चौक काँक्रिट मार्गावरील कारमेल हायस्कूलसमोर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्याचप्रमाणे महेंद्र काळे यांच्या हास्पिटलसमोर आणि जिल्हा स्त्री रुग्णालयासमोरच्या मार्गाची स्थिती केविलवाणी झाली आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या रस्त्यांची अवस्था आणि अलीकडेच बांधलेल्या रस्त्यांची तुलना केली तर जुने रस्ते अद्यापही शाबूत असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे टावर चौकापासून पुढे जाणाºया स्कायलार्क हॉटेलसमोर मोठमोठे भगदाड पडले आहेत. या मार्गाची ठिकठिकाणी चाळणी झाली आहे. सोबतच हेड पोस्ट आॅफिस ते सिव्हिल लाइन मार्गावर बीएसएनएल कार्यालयासमोरही तीच अवस्था आहे. सीताबाई आर्ट महाविद्यालयासमोरही मार्ग उखडला आहे. नेहरू पार्क ते गोरक्षणकडे जाणाºया मार्गाच्या भेगा सुटल्याने रस्त्याला उखडण्यास सुरुवात झाली आहे. बाबा गावंडे यांच्या घरासमोर आणि सहकार नगराजवळ खड्डे पडले आहेत.
महापालिका प्रशासनाची चुप्पी का?
सोशल आॅडिट झालेल्या आठ रस्त्यांमध्ये निकृष्टतेचे अनेक दाखले समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाने कारवाई केल्यानंतर कारवाईचा चेंडू महापालिकेच्या कोर्टात आहे. जानेवारीत सभा घेऊन कारवाईची भाषा करणाºया महापालिकेने अद्याप एकही पाऊल त्या दिशेने टाकलेले नाही. त्यामुळे अकोलेकरांमध्ये महापालिका प्रशासनाबाबतही रोष व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा पाहणी
सुरुवातीच्याच पावसाने बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांचे पितळे उघडे पडले. अकोलेकर शिव्याशाप देत असले तरी, अकोला सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप पाहिजे तशी दखल घेतलेली नाही. याबाबत अकोला विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर धिवरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पुन्हा पाहणी करू, असे सांगितले. संपूर्ण अकोलेकर उघड्या डोळ्यांनी दुर्दशा पाहत असताना, सार्वजनिक बांधकाम विभाग काय नव्याने पाहणी करणार आहे, असा प्रश्न सर्वसामान्य अकोलेकर करीत आहेत.