कपाशी बियाण्याचे दोन नमुने अप्रमाणित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 10:28 AM2020-08-11T10:28:32+5:302020-08-11T10:28:59+5:30
कपाशी बियाण्याच्या दोन नमुन्यांमध्ये निकषांपेक्षा जास्त बीटी चे प्रमाण असल्याचे निष्पन्न झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बीटी कापूस बियाण्याचे दोन नमुने अप्रमाणित आढळून आल्याने संबंधित बियाणे कंपनीविरोधात जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शुक्रवारी दोन प्रकरणे जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले.
अकोला शहरानजीक अकोट रोडवरील बायर बायोसायन्स कंपनीच्या गोदामातून जिल्हा परिषद कृषी विभागाच्या पथकामार्फत गत जूनमध्ये बीटी कपाशी बियाण्याचे नमुने घेण्यात आले होते. घेण्यात आलेले बियाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते.
त्यामध्ये बीटी कपाशी बियाण्याचे दोन नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल जिल्हा परिषद कृषी विभागाला जुलैमध्ये प्राप्त झाला. प्राप्त अहवालानुसार बीटी कपाशी बियाण्याचे दोन नमुने अप्रमाणित आढळून आल्याने, संबंधित बियाणे कंपनीविरोधात जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शुक्रवार, ७ आॅगस्ट रोजी जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोन प्रकरणे दाखल करण्यात आली.
निकषापेक्षा जास्त आढळून आले ‘बीटी’ चे प्रमाण!
तपासणी अहवालानुसार अप्रमाणित आढळून आलेल्या बीटी कपाशी बियाण्याच्या दोन नमुन्यांमध्ये निकषांपेक्षा जास्त बीटी चे प्रमाण असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बीटी कपाशी बियाण्याचे दोन नमुने अप्रमाणित आढळून आल्याने, संबंधित बियाणे कंपनी विरोधात दोन प्रकरणे जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात शुक्रवारी दाखल करण्यात आले.
-मिलिंद जंजाळ
मोहीम अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद.