मूर्तिजापुरात दोन दुकानांना लावले ‘सील'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:51+5:302021-03-14T04:17:51+5:30
मूर्तिजापूर: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे असताना शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. नियमांचे उल्लंघन ...
मूर्तिजापूर: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे असताना शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात न.प.ने धडक कारवाई सुरू केली असून, या अंतर्गत विनामास्क असणाऱ्या १४ जणांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच वारंवार सूचना देऊनही कोरोना चाचणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने 'सील' करण्यात आली आहेत. या दुकानांना शनिवारी तहसीलदार व नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई करीत ‘सील’ लावले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कलम १४४ अंतर्गत जमाव करणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत येथील नागरिक व दुकानदार गंभीर नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कोरोना चाचणी करून न घेतलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानांना शनिवारपासून ‘सील’ लावण्याचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. शहरातील जेके ग्लास व हॉलिवूड फॅशन या दोन दुकानांच्या व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी न केल्याने या दुकानाना अनिश्चित कालावधीसाठी ‘सील’ लावण्यात आले आहे. त्याचबरोबर मास्क न लावता शहरात मुक्तसंचार करणाऱ्या १४ लोकांवर कारवाई करीत २०० प्रमाणे दंडात्मक कारवाई करून २ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
--------------------------------------
तपासणीसाठी नागरिकांमध्ये उत्साह
शहरातील नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक मोठ्या संख्येने तपासणी करून घेत आहेत. शहरात दररोज सुरू असलेल्या शिबिरात नागरिक तपासणी करीत आहेत. शुक्रवारी १५२ जणांनी तपासणी केली, तर शनिवारी २३५ लोकांनी चाचणी केली.
----------------------------------
जे नागरिक, व्यापारी नियमांचे पालन करणार नाहीत, अशांवर कारवाई करावी लागणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे.
-विजय लोहकरे, मुख्याधिकारी, नगर परिषद, मूर्तिजापूर