दारूसाठी पैसे मागण्यावरून दोघांची झटापट; डोक्याला मार लागल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 05:15 PM2020-06-08T17:15:38+5:302020-06-08T17:18:00+5:30
छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला.
अकोला : अकोट फैल परिसरातील भोईपुरा येथील रहिवासी प्रवीण कांबळे हा त्यांच्या शेजारीच राहत असलेल्या गोलू कांबळे आणि अविनाश कांबळे याना दारू पिण्यासाठी रोजच पैसे मागायचा मात्र त्यांनी नकार दिल्याने त्यांनाच शिवीगाळ केल्यानंतर रविवारी दुपारी झालेल्या किरकोळ वादात झालेल्या दोन भावंडानी पंकजला ढकलून दिल्याने तो जमिनीवर कोसळला. यामध्ये त्याच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. या प्रकरणात अकोट फाईल पोलिसांनी कांबळे पिता पुत्रास अटक केली.
अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोईपुरा येथे असलेल्या मच्छी मार्केटमध्ये प्रवीण विजय कांबळे (वय 40) याने गणेश विश्वनाथ कांबळे यांचा मुलगा गोलू गणेश कांबळे आणि अविनाश गणेश कांबळे यांना 4 जून रोजी दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. त्यावेळी या बाप-लेकांनी प्रवीणला दारू पिण्यास पैसे दिले नाही. या कारणावरुनच प्रवीण कांबळे हा गणेश कांबळे यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांना अश्लील शिवीगाळ करत होता.
रविवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान गोलू आणि अविनाश हे भोईपुरा परिसरात असताना प्रविणने त्यांना शिवीगाळ करीत अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोन भावंडांनी प्रवीण कांबळे याला ढकलले असता तो तोल जाऊन जमिनीवर कोसळला.
दारूच्या प्रचंड आहारी गेलेल्या प्रवीणची प्रकृती ठीक नसल्याने तो अशक्त होता. अशातच जमिनीवर कोसळल्याने त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे अविनाश कांबळे, गोलू कांबळे याच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रवीण कांबळे यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रविवारी सायंकाळी उपचार सुरू केल्यानंतर सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास प्रवीण कांबळे यांचा मृत्यू झाला. प्रवीणचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे तसेच छाती व डोक्यावर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या प्रकरणात गणेश विश्वनाथ कांबळे त्यांचा मुलगा गोलू गणेश कांबळे आणि अविनाश गणेश कांबळे या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
प्रवीण कांबळे यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नाही. गोलू आणि अविनाशसोबत प्रवीण कांबळे याची झटापट झाली होती. या झटापटीत प्रवीण कांबळे खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला आणि छातीला मार लागला. उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतरच प्रवीणच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
-मिलिंदकुमार बहाकर ठाणेदार अकोट फाइल पोलीस स्टेशन