अकोल्यातील रोबोटिक्स प्रशिक्षकाच्या दोन टीम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत
By admin | Published: April 3, 2017 08:25 PM2017-04-03T20:25:54+5:302017-04-03T20:25:54+5:30
२३ ते २५ एप्रिल १७ दरम्यान यूएसएमध्ये सहभागी होणार दोन्ही टीम.
संजय खांडेकर
अकोला : अकोल्यातील रोबोटिक्सप्रशिक्षक काजल प्रकाश राजवैद्य यांच्या मुंबईतील दोन टीम आगामी २३ ते २५ एप्रिल १७ दरम्यान यूएसएमध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्सच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या जात आहे. जगभरात रोबोटिक्सचे नवे युग अवतरत आहे. रोबोटिक्सच्या तंत्रज्ञानाचे धडे आता शाळेतून मिळण्याची शक्यता सर्वत्र वर्तविली जात आहे. ही स्थिती देशात असताना अकोल्यातील रोबोटिक्स प्रशिक्षकाची झेप कौतुकास्पद ठरत आहे.
वेक्स इंडिया चॅम्पियनशिप दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर रोबोटिक्सच्या स्पर्धा घेत असते. २१ जानेवारी १७ रोजी दिल्ली येथील शिव नादर येथे यंदा या स्पर्धा पार पडल्या. माध्यमिक शिक्षण विभागात घेण्यात आलेल्या ११ टीमच्या स्पर्धेतून मुंबई येथील किड्स इन्स्टिट्यूट शाळेने अजिंक्यपद मिळविले. मास्टर मेन्यूव्हर्स टीमच्या नावाने या शाळेतील आद्य परिवाल, वंश दिवरा, आरव पारेख, वियोग शाह आणि माहिर शाह हे विद्यार्थी सहभागी झाले होते. तर प्राथमिक शिक्षण विभागात घेण्यात आलेल्या दोन टीमच्या स्पर्धेतूनही मुंबई येथील किड्स इन्स्टिट्यूट शाळा अव्वल ठरली. झोटॅक टीमच्या नावाने या शाळेतील तन्मय शाह, माहिर अजमानी, अक्षयन दम्मानी, अनव्ह अग्रवाल हे विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबईतील किड्स इन्स्टिट्यूूट शाळेच्या या विद्यार्थ्यांना अकोल्यातील काजल राजवैद्य या रोबोटिक्स प्रशिक्षकाचे मार्गदर्शन लाभले आहे. अकोल्यातील मनुताई कन्या मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या युवतीने बीई, एमई केल्यानंतर रोबोटिक्सचे अद्ययावत धडे घेतले. त्यानंतर रिसोड येथील उद्योजक पुरुषोत्तम अग्रवाल यांनी मुंबईतील विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे धडे गिरविण्याची जबाबदारी अकोल्यातील काजलवर टाकली. काजलने मुंबईतील विद्यार्थ्यांना घडवून आधी राष्ट्रीय आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे. वेक्स रोबोटिक्सची जागतिक चॅम्पियनशिप यूएसएमध्ये होत असून, अकोल्यातील प्रशिक्षक काजलसह मुंबईतील विद्यार्थी २0 एप्रिल १७ रोजी यूएसएकडे रवाना होणार आहेत.