कृषी विद्यापीठाचे दोन हजारांवर विद्यार्थी जाणून घेणार शेतकऱ्यांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 01:08 PM2019-03-17T13:08:24+5:302019-03-17T13:08:29+5:30
कृषी विद्यापीठाचे दोन हजारांवर विद्यार्थी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तद्वतच ७२ कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान, माहिती देणार आहेत.
अकोला: विदर्भातील शेती शाश्वत, समृद्धतेकडे नेण्यासाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी अनेक उपक्रम राबविण्याचे ठरविले असून, याचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठाचे दोन हजारांवर विद्यार्थी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तद्वतच ७२ कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान, माहिती देणार आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानुषंगाने शेती व शेतकरी डोळ्यासमोर ठेवून कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान, तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवार फेरी, अॅग्रोटेक आदी माध्यमातून शेतकºयांचे प्रबोधन करण्यात आले. कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान, विविध पिके प्रात्यक्षिक स्वरू पात शिवारफेरीतून दाखविण्यात आली, तर नव्या संशोधनाची वाटचाल, आलेले भरपूर उत्पादन, विकसित यंत्र, बी-बियाणे,जैविक खते, ट्रायकोडर्मा, नवीन पिकाच्या जाती आदींची माहिती शेतकºयांना अॅग्रोटेकमधून देण्यात आली. कृषी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. पीकवार शेतावर शेती शाळा घेऊन शेतकºयांना त्या-त्या पिकांचे तंत्रज्ञान, व्यवस्थापन समजावून सांगितले जात आहे. पीक रचना, पीक पद्धतीत बदल करू न अधिक उत्पादन कसे घेता येईल, त्यासाठी कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यासोबतच विषमुक्त अन्न निर्मितीसाठी सेंद्रिय शेती विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, कृषी विद्यापीठात यावर संशोधन करण्यात येणार आहे. कृषी विद्या शाखेच्या प्रक्षेत्रावर यासाठीचे अनेक प्रयोग घेण्यात येत आहेत. सेंद्रिय भाजीपाला उत्पादन घेण्यात येत असून, हे काम विद्यार्थी करीत आहेत.
विदर्भातील शेती, शेतकरी विकासाच्या दृष्टीने यावर्षी विदर्भातील प्रत्येक गावात कृषी विद्यापीठाचे संशोधन, तंत्रज्ञान पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी दोन हजार विद्यार्थ्यांसह ७२ शास्त्रज्ञ काम करीत आहेत. शेती समृद्ध, शाश्वत करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्यात आले आहे.
- डॉ. विलास भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.