विना राॅयल्टीचे गौणखनिज भरलेले दोन टिप्पर सोडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:22 AM2021-09-23T04:22:08+5:302021-09-23T04:22:08+5:30
विजय शिंदे अकोटः गौणखनिजाची चोरी, अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उभारण्यात आलेला गौणखनिज तपासणी नाका कुचकामी ठरत आहे. ...
विजय शिंदे
अकोटः गौणखनिजाची चोरी, अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उभारण्यात आलेला गौणखनिज तपासणी नाका कुचकामी ठरत आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी तपासणी नाक्यावर विना राॅयल्टी असलेले १२ ब्रास गौणखनिज भरलेले दोन टिप्पर कारवाई न करता सोडण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर कारवाई टाळण्यासाठी स्थानिक पातळीवरून जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती आहे.
पोपटखेड परिसरातील खदानहून गौणखनिज वाहतूक करणारे (एमएच ३० बीडी २४३५) व (एमएच ३० बीडी ०९७२) क्रमांकाच्या वाहनांची गाजीपूर येथील तपासणी नाक्यावर तपासणी करण्यात आली. या वाहनामध्ये प्रत्येकी सहा ब्रास मुरुम गौणखनिज भरलेला होता. या वाहतुकीवेळी गौणखनिज वाहतूक परवाना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राॅयल्टी वाहन चालकाजवळ नसल्याची माहिती तपासणी नाक्यावरील पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशावरून राॅयल्टी नसलेली दोन्ही वाहने सोडण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही दोन वाहने दि. १७ सप्टेंबर रोजी पथक कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण करून सोडण्यात आल्याची माहिती आहे. वरिष्ठांकडून कारवाई करण्यात भेदभाव करण्यास भाग पाडले जात असल्याने एखादे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता पाहता तपासणी नाक्यावर रात्रंदिवस पहारा देणारे कर्मचारी धास्तावले आहेत. दरम्यान, या अवैध प्रकाराचे बिंग फुटल्यावर जिल्हा प्रशासनापर्यंत माहिती गेल्यानंतर स्थानिक पातळीवरून जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करण्यात आल्याची माहीती आहे.
-----------------
पोपटखेड मार्गावरील गौणखनिज तपासणी नाक्यावर घडलेल्या घटनेची चौकशी करण्यात येईल. तपासणी नाक्यावरील कार्यरत पथकाला स्पष्टीकरण मागविण्यात येईल.
-नीलेश मडके, तहसीलदार, अकोट.