डुकरांच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 11:02 AM2020-03-08T11:02:59+5:302020-03-08T11:03:15+5:30
प्रमोद त्र्यंबकराव गावंडे (४६, रा. काटेपूर्णा, अकोला) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
बोरगाव मंजू (अकोला): रस्त्यात अचानक आडव्या आलेल्या डुकरांच्या कळपाने धडक दिल्यामुळे दुचाकीवरून पडून एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना कानशिवणी ते वणी रंभापूर मार्गावर शनिवारी रात्री उशिरा घडली. प्रमोद त्र्यंबकराव गावंडे (४६, रा. काटेपूर्णा, अकोला) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
काटेपूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद त्र्यंबकराव गावंडे हे शनिवारी त्यांचे नातेवाईक दिनेश छबीले यांच्याकडे कानशिवणी येथे गेले होते. रात्री आपल्या गावी एम.एच.३० टी २४५२ क्रमांकाच्या मोटारसायकलने परत जात असताना सुकळी नंदापूरनजीकच्या जंगलातून डुकरांचा एक भला मोठा कळप अचानक रस्त्यावर आडवा आला. भरधाव वेगाने जात असलेले प्रमोद गावंडे यांच्या लक्षात येण्याआधीच मोटारसायकल डुकरांच्या कळपात घुसली. यामध्ये प्रमोद गावंडे खाली कोसळले. मोटारसायकलवरून कोसळण्याचा मार आणि डुकरांच्या धडकेने ते गंभीर जखमी झाले. यावेळी मागाहून येत असलेले ज्ञानेश्वर छबीले, ज्ञानेश्वर महल्ले, गजानन वसु यांनी प्रमोद गावंडे यांची डुकराच्या तावडीतून सुटका करून त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.