राष्ट्रीय महामार्गावर ट्रक अपघात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 12:37 PM2021-06-28T12:37:38+5:302021-06-28T12:38:21+5:30
Murtijapur Accident News : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकखाली दबल्याने दुचाकीस्वार ठार झाला.
मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील ग्राम सोनोरी जवळ अरूंद पुलावर झालेल्या अपघात दुचाकीस्वार ट्रकखाली दबून जागीच ठार झाल्याची घटना २८ जून रोजी सकाळी घडली. शेख इम्रान शेख रहेमान (३२) राहणार काटेपूर्णा असे मृतकाचे नाव आहे.
तालुक्यात अपघाताची श्रृंखला चालुच असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे दुसऱ्या दिवशीही दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान शेख इम्रान राहणार काटेपूर्णा रेल्वे स्टेशन हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० ए डब्ल्यू ५८३७ ने मूर्तिजापूर येथे येत असताना अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमपी एचएच ४९४४ चा अचानक टायर फुटल्याने ट्रक रस्त्यात उलटला असता मागच्या बाजूने येणाऱ्या एमएच ०४ सीजी ५०८७ क्रमांकाच्या ट्रकने समोरच्या ट्रकला लगेच ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला परंतु सदर ट्रक शेख इम्रान यांच्या दुचाकीवर जाउन उलटला त्याखाली दबून शेख इम्रान याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शेख इम्रान हे बडनेरा येथे रेल्वेत नौकरीवर असून ड्यूटीवर जाण्यासाठी ते मूर्तिजापूर येथे येत होते इथून मेलने बडनेरा जाणार होते त्यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. परंतु काळाने त्यांच्यावर रस्त्यातच घाला घातला. दरम्यान काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती कळताच वंदेमातरम आपत्कालीन पथक काटेपूर्णा व मूर्तिजापूर आणि वंचित आघाडी आपत्कालीन मूर्तिजापूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणला.