कंटेनरनं दुचाकीस्वाराला तब्बल २ किलोमीटरपर्यंत नेलं फरफटत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 10:41 AM2019-07-11T10:41:09+5:302019-07-11T10:42:17+5:30
मध्यरात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
मूर्तिजापूर (अकोला ): राष्ट्रीय महामार्गावर हेंडज फाटा दरम्यान भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास धडक देऊन त्याला तब्बल दोन किलोमीटर फरफटत नेल्याची घटना बुधवारी रात्री १० वाजताचे दरम्यान घडली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
कंटेनर क्रमांक (एनएल ०१ ए बी १९३९) हा अमरावतीच्या दिशेने ट्रॅक्टर वाहून नेत होता. दरम्यान नितीन सुधाकर डाबेराव (३९) रा. पळसो बढे त्यांच्या दुचाकीने (एमएच २७ सीई १८७१) अमरावतीला जात होते. मागून येणाऱ्या कंटेनरने नितीन डाबेराव यांना एका बाजूने धडक दिली. त्यामुळे कंटेनरला असलेला हूक थेट त्यांच्या डोक्यात घुसला. त्याला अडकून तब्बल दोन किलोमीटरचे वर फरफटत गेले. ही बाब दुसऱ्या वाहनाच्या चालकाने कंटेनर चालकाच्या लक्षात आणून दिली. तेव्हा चालकाने डाबेराव यांचा मृतदेह महामार्गाच्या कडेला टाकून दिला.
या घटनेची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. अपघात झालेल्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांना मृतदेह आढळून आला. ढाबा चालक सतनामसिंग निरांजनसिंग गील यांच्या फिर्यादीवरून कंटेनर जप्त करुन पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. महाकाय कंटेनरला दोन्ही बाजूला रेडिअम पट्टया व इंडिकेटर लाइट नसल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. चालकाविरुद्ध मोटर कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार रहिम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तेजराव तायडे करत आहेत.