दुचाकीस्वारांना चिरडले; दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 02:13 AM2017-11-02T02:13:23+5:302017-11-02T02:13:27+5:30
बोरगाव मंजू : भरधाव मालवाहू वाहनाने चिरडल्याने दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील कुरणखेडनजीक आरामशीनजवळ १ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३0 वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : भरधाव मालवाहू वाहनाने चिरडल्याने दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील कुरणखेडनजीक आरामशीनजवळ १ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३0 वाजता घडली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अफताबोद्दीन कलीमोद्दीन (१७)व शेख मुजबद्दीन शेख सत्तार (२0)अशी मृतांची नावे आहेत.
कुरणखेड येथील अफताबोद्दीन हा त्याच्या भावाला नवीन वस्तीत शाळेत सोडून दुचाकी क्र.एमएच ३0 एएम २१७४ ने परत येत होता. त्याच्या दुचाकीवर शे मुजबद्दीन हासुद्धा बसलेला होता. त्यांच्या दुचाकीला कुरणखेड येथील आरामशीनजवळ अकोल्याकडे जात असलेल्या मालवाहू ट्रकने जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातानंतर महामार्गावरील दोन्हीकडील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी एजाज खा नवाज खा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोरगावमंजू पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार पी. के. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
महामार्गाचे चौपदरीकरण संथ गतीने
अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने अनेक अपघात घडत आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करणाचा शुभारंभ दुतर्फा वृक्षतोड करून करण्यात आला होता; मात्र हे चौपदरीकरण कासव गतीने सुरू असल्याने अजूनही पूर्ण झाले नाही. त्यात भरीस भर महामार्गावर खड्डे पडले आहेत, तर दिशादर्शक फलक, गतिरोधकवर निशाणीसह समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.