दुचाकी चोरीतील आरोपी सुटले; नंबरप्लेट बनविणारा अडकला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:18 AM2017-07-19T02:18:51+5:302017-07-19T02:18:51+5:30
अकोला: ऐशोआरामासाठी दुचाकी चोरून तिची विक्री करणाऱ्या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्याने, पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले.
अकोला: ऐशोआरामासाठी दुचाकी चोरून तिची विक्री करणाऱ्या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्याने, पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची जामिनावर सुटका केली; मात्र या प्रकरणात कोणताही समावेश नसणाऱ्या मालेगाव येथील दुचाकीची नंबरप्लेट बनविणारा युवक यात अडकला. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.
रणपिसे नगरमध्ये राहणारे आकाश नंदकिशोर तायडे यांची एमएच ३0 एएक्स २२४४ क्रमांकाची दुचाकी चोरीस गेली होती. त्यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा शोध घेतला असता, महाविद्यालयीन शिक्षण घेणारे श्रेयश ठाकरे आणि अक्षय मसने यांची नावे समोर आली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी दोन दुचाक्या चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन दुचाक्या जप्त केल्या. या प्रकरणातील एक दुचाकीवर मालेगाव येथील नितीन श्रीराम कंकाळ याच्याकडून त्यांनी नंबरप्लेट बनवून घेतली होती; परंतु पोलीस तपासात दुचाकीवरील हा नंबर बनावट असल्याचे समोर आल्याने, पोलिसांनी मालेगाव येथून नितीन कंकाळ याला मंगळवारी अटक केली. त्याला व आरोपी श्रेयश ठाकरे, अक्षय मसने यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला तर नितीन कंकाळ याची कारागृहात रवानगी केली. आरोपीतर्फे अॅड. केशव एच. गिरी, अॅड. वैशाली गिरी यांनी काम पाहिले.