दोन वर्षाआतील बालकांचा अॅनिमियाशी लढा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 03:01 PM2019-10-28T15:01:07+5:302019-10-28T15:01:33+5:30
आयर्नची कमतरता असलेल्या मुलांचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
अकोला: महिलांसोबतच किशोरवयीन मुलींमध्ये अॅनिमियाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे; परंतु नॅशनल न्यूट्रिशन सर्व्हेच्या एका अहवालानुसार दोन वर्षांपेक्षा कमी वयाची मूलंही अॅनिमियाशी लढा देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरीरातील आयर्नची कमतरता असलेल्या मुलांचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
अॅनिमियाशी लढा देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; मात्र अनेक मुलं अॅनिमियाने ग्रस्त आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या चिमुकल्यांसह किशोरवयीन मुलींमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. तर शरीरात आयर्नची कमतरता असलेल्या मुलांचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त असल्याचे धक्कादायक वास्तव नुकत्याच झालेल्या नॅशनल न्यूट्रिशन सर्व्हेतून समोर आले आहे. शहरी भागात चुकीच्या पद्धतीने दिल्या जाणाऱ्या आहारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गत काही वर्षांपासून चिमुकल्यांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. देशभरातील विचार करता २७ राज्यांमध्ये शालेय वयाच्या आतील मुलं, १५ राज्यांमध्ये शालेय मुलं, २० राज्यांमध्ये किशोरवयीन मुलांमध्ये अॅनिमिया असल्याचे समोर आले. तसेच १ ते ४ वर्ष वयोगटातील जवळपास ४९ मुलांमध्ये आयर्नची कमतरता असल्याचे वास्तव समोर आले आहे. आईच्या आरोग्यावर मुलाचे आरोग्य अवलंबून असते. सरकारी रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाºया निम्म्याहून अधिक महिलांमध्ये पोषक घटकांची कमतरता आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांचाही योग्य विकास होत नाही. अॅनिमियामुळे मुलांचं आरोग्यच नाही, तर त्यांच्या शिक्षणावरदेखील परिणाम होतो.
असे आहे अॅनिमियाचे प्रमाण
- शालेय वयाच्या आतील मुले - ४१ टक्के
- शालेय वयातील मुले - २४ टक्के
- किशोरवयीन मुले -२८ टक्के
आयर्नची कमतरता
- प्री-स्कूलर्स - ३२ टक्के
- शालेय मुलं - १७ टक्के
- किशोरवयीन मुलं - २२ टक्के
या आजाराचा धोका
- मानसिक कार्यक्षमता आणि मेंदूच्या विकासावर दुष्परिणाम होतो आहे.
- अशक्तपणा, थकवा, कमी उत्पादनक्षमता उद््भवते.
- तसेच इन्फेक्शनचा धोकाही वाढतो आहे.
- कमी हिमोग्लोबिन म्हणजे आयर्न, फोलेट, व्हिटॅमिन बी-12 अशा घटकांची कमतरता.
- यामुळे मलेरिया, पोटातील जंतांसंबंधी आजारांचा धोका.
- थॅलेसेमिया आणि सिकलसेलसारखे आजारही बळावू शकतात.
मुलांना पूरक आहार मिळत नाही. शहरी भागात फूड फॅशनचे प्रस्त वाढल्याने चिमुकल्यांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलांच्या पोषण आहाराकडे लक्षण देण्याची गरज आहे.
- डॉ. विनीत वरठे, बालरोग तज्ज्ञ, जीएमसी, अकोला.