दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला युवक सुरतमध्ये सापडला
By admin | Published: January 5, 2017 08:50 PM2017-01-05T20:50:36+5:302017-01-05T20:50:36+5:30
दोन वर्षांपूर्वी जुने शहरातील शिवसेना वसाहतीतून अचानक बेपत्ता झालेला २१ वर्षीय युवक सुरतमध्ये गवसला.
Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 5 - दोन वर्षांपूर्वी जुने शहरातील शिवसेना वसाहतीतून अचानक बेपत्ता झालेला २१ वर्षीय युवक सुरतमध्ये गवसला. दोन वर्षांपासून मुलाचे मुख न बघितलेल्या आई-वडिलांनी त्याला पोटाशी धरीत, आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.
शिवसेना वसाहतीमध्ये राहणारा दत्ता पुंडलिक चतारकर(२१) हा ३ जानेवारी २0१५ रोजी बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शहरात शोध घेतला; परंतु तो दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही युवक बेपत्ता झाल्याची नोंद केली. त्यानंतरही दत्ताचा शोध घेण्यात आला. आई-वडील, भावाने दत्ताच्या शोधात कोणतीही कसर सोडली नाही. मित्रमंडळींनीसुद्धा दत्ताचा शोध घेतला; परंतु तो सापडला नाही. दत्ताच्या आई-वडिलांनी आपला मुलगा आता मिळणार नाही, त्यामुळे त्याची आशाही सोडून दिली होती. दत्ताबाबत शिवसेना परिसरातील अनेकांनी विविध अफवाही पसरविल्या होत्या. दत्ता हा अवलिया आहे, अशी सर्वांची भावना आहे. त्यामुळे काही लोकांनी त्याचे काळेबेरे केल्याची चर्चा लोकांमध्ये होती. त्यामुळे दत्ताच्या आई-वडिलांना अधिकच दु:ख व्हायचे. दत्ता आता येईल, याची त्यांनी खात्री बाळगणेही सोडून दिले होते; परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शिवसेना वसाहतीमध्ये राहणारे संदीप श्रीकृष्ण पोलाखडे, विनोद विठ्ठल दोरकर, सागर ओंकार डोंगरे हे कॅटरिंगच्या कामासाठी गुजरातमधील वडोदरा येथे गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर ते रेल्वेगाडीमध्ये बसले. सुरत रेल्वे स्टेशनवर ते उतरले असता, दत्ता त्यांच्याकडे आला आणि खाण्यासाठी काही तरी मागू लागला. दत्ताला पाहताच, युवकांनी त्याला ओळखले आणि त्याला आपल्यासोबत घेतले आणि थेट अकोल्यात आणून पोलीस ठाण्यात हजर केले. या तीन युवकांमुळे दत्ता मिळाला. युवकांनी जुने शहरचे ठाणेदार रियाज शेख यांच्या समक्ष दत्ताला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. यावेळी दत्ताला पोटाशी धरून आई-वडील, भावाने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांनी युवकांचे मनोमन आभार मानले.
ठाणेदारांनी केले युवकांचे कौतुक
संदीप पोलाखडे, विनोद दोरकर, सागर डोंगरे यांच्यामुळेच दत्ता चतारकर हा त्यांच्या आई-वडिलांना मिळाला. दत्ता सुरत येथील रेल्वे स्टेशनवर भीक मागून जीवन जगत होता. तिन्ही युवकांनी त्याला ओळखून आणि समयसुचकता दाखवून अकोल्यात आणले. त्यांनी केलेले कार्य मोलाचे आहे, याबद्दल ठाणेदार रियाज शेख, नगरसेवक दिलीप देशमुख यांनी युवकांचे कौतुक केले.