देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचण्यापूर्वीच नागपूर पोलिसांनी नितीन देशमुख यांना घेतलं ताब्यात
By आशीष गावंडे | Published: April 20, 2023 10:40 AM2023-04-20T10:40:46+5:302023-04-20T10:48:45+5:30
पिण्याच्या पाण्यासाठी अकोला ते नागपूर पायी मोर्चा
आशिष गावंडे, अकोला: जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघात खारपानपट्ट्यात समाविष्ट होणाऱ्या 69 गावांमधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी अकोला ते नागपूर पायी मोर्चा काढणाऱ्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांना नागपूर पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 69 गावातील पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर पायी मोर्चा काढला होता. त्यामध्ये खाऱ्या पाण्याच्या टँकरचा समावेश होता.
पालकमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी खाऱ्या पाण्याची चव घ्यावी व त्यानंतर स्थगिती उठवावी अशी शिवसेनेची मागणी होती. नागपूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचण्यापूर्वीच नागपूर पोलिसांनी नितीन देशमुख यांना अटक केली.
अकोला आंदोलन: शिवसेनेचे (ठाकरे गट ) आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना पोलिसांकडून अटक pic.twitter.com/eyV26Kqv70
— Lokmat (@lokmat) April 20, 2023
यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे गटनेता गोपाल दातकर, शहर प्रमुख (अकोला पूर्व ) राहुल कराळे, उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे, दिलीप बोचे, ज्ञानेश्वर म्हैसने यांसह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे.