दिव्यांगांना मिळणार घरपोच ‘यूडीआयडी’ कार्ड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 03:13 PM2018-11-16T15:13:58+5:302018-11-16T15:14:10+5:30
अकोला : केंद्र शासनाच्या दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगांना ‘यूडीआयडी’ प्रणालींतर्गत घरपोच ‘यूडीआयडी’ कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अकोला : केंद्र शासनाच्या दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगांना ‘यूडीआयडी’ प्रणालींतर्गत घरपोच ‘यूडीआयडी’ कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवार, १५ नोव्हेंबर रोजी दिव्यांग वैद्यकीय मंडळाचे उद््घाटन करण्यात आले.
दिव्यांगांना आतापर्यंत राज्य शासनातर्फे ‘एसएडीएम’प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्यात येत होते; परंतु केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ‘एसएडीएम’प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करणे बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी नवीन नियमानुसार दिव्यांगांना ‘यूडीआयडी’ कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र घरपोच देण्यात येणार आहे. त्यासाठी दिव्यांगांना आॅनलाइन अर्ज करावा लागणार आहे. या अर्जाच्या पडताळणीसाठी दिव्यांग वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली असून, गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या हस्ते मंडळाचे उद््घाटन करण्यात आले. उद््घाटनासोबतच रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग क्रमांक १०६ मध्ये प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, उपवैद्यकीय अधक्षीक डॉ. सचिन गाडगे, डॉ. उमप, डॉ. कल्पना काळे, समाजसेवा अधिकारी संदीप चुनडे यांच्यासह विविध विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
प्रमाणपत्रासाठी करावा लागेल आॅनलाइन अर्ज!
केंद्र शासनाच्या नवीन नियमानुसार दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आता ‘यूडीआयडी’प्रणालीच्या संकेतस्थळावर भेट देऊन आॅनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्जाच्या छाननीनंतर दिव्यांगांना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे तपासणीसाठी दिवस व वेळ कळविली जाईल.
ही कागदपत्रे आवश्यक
रुग्णालयात तपासणीसाठी जाताना आॅनलाइन अर्जाच्या प्रतीसोबत जोडलेली मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती, पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्र तसेच रेल्वे सवलत नमुना दोन प्रतीत सोबत ठेवावा.
केंद्र शासनाच्या नवीन नियमानुसार जीएमसीमध्ये गुरुवारी दिव्यांग वैद्यकीय मंडळाचे उद््घाटन करण्यात आले. आॅनलाइन अर्जाच्या छाननीनंतर दिव्यांगांना तपासणीसाठी गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस निश्चित करण्यात आले आहे.
- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.