किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 02:09 PM2019-10-01T14:09:58+5:302019-10-01T14:10:04+5:30
सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आता निकम बाजू मांडणार आहेत.
अकोला: अखिल भारतीय महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केल्यानंतर सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आता निकम बाजू मांडणार आहेत. यातील तीन आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती आहे.
स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवार, ६ मे रोजी दुपारी १२ वाजता किसनराव हुंडीवाले त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत न्यास नोंदणी कार्यालयात उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहीरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्रय तोंडे व साबीर यांच्यासह साथीदारांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात येऊन किसनराव हुंडीवाले यांची हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामधील विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, श्रीराम कसदन गावंडे यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली तर सतीश तायडे, विशाल तायडे, मयूर अहीर, दिनेश ठाकूर, प्रतीक तोंडे या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने सूरज प्रल्हाद गावंडे याला बुलडाणा जिल्ह्यातून अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील व त्यांच्या पथकाने करून ५६५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणात आता विशेष सरकारी विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.