अखेर अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2016 01:40 AM2016-05-25T01:40:39+5:302016-05-25T01:40:39+5:30
देऊळगावराजा येथील घटना; विद्यार्थीदशेतच प्रेमाची झिंग, तीन दिवसांपूर्वी केले होते पलायन.
देऊळगांवराजा (जि. बुलडाणा): प्रेमाची झिंग चढलेले व गेल्या तीन दिवसांपूर्वी पलायन केलेल्या एका अल्पवयीन प्रेमीयुगलाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही या गावातील एका दहावी झालेल्या मुलाचे सध्या दहावीत शिकत असलेल्या एका मुलीशी प्रेमसंबंध जुळले. यातून मग आयुष्यभर सोबतच जगायचे, अशा आणाभाका दोघांनी घेतल्या; मात्र दोघेही एकाच समाजाचे नसल्याने आपल्या प्रेमाला घरातून विरोध होईल, याची त्यांना भीती होती. परिणामी, कुटुंबीयांना काही कळण्यापूर्वीच दोघांनीही मनाचा ठाम निश्चय करुन घरातून पलायन करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनीही २0 मे रोजी एका मित्राच्या मदतीने गावातून पोबारा केला. या मित्राने त्यांना औरंगाबादपर्यंत पोहोचण्यास मदत केली. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याचे कळताच तिच्या वडिलांनी शोधाशोध सुरु केली. यानंतर त्यांना या प्रेम प्रकरणाचा सुगावा लागला. त्यांनी लगेच २१ मे रोजी दे.राजा पोलीस स्टेशनला मुलीला पळवून नेल्याची तक्रार केली. या तक्रारीवरून मुलाविरोधात भादंवि ३६३, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार कैलास ओव्हळ यांनी तपासाचे चक्र फिरविले. ओव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे व रवींद्र दळवी यांनी या प्रेमीयुगलाचा मोबाइल ट्रॅकींगच्या साह्याने तपास सुरू केला. या तपासामध्ये हे प्रेमीयुगुल सर्वप्रथम औरंगाबाद तेथून पुण्याकडे गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, प्रेमी युगुलामधील मुलाने त्याच्या मित्रासोबत मोबाइलवरून संपर्क केल्यामुळे पोलिसांना त्यांचे ह्यलोकेशनह्ण शोधणे सोपे झाले. हे प्रेमीयुगुल पुण्यावरून पनवेल (मुंबई) कडे रवाना झाले. पनवेल येथील एका अनोळखी इसमाने त्यांना त्यांच्या घरी राहण्यासाठी खोली दिली. दरम्यान, या अल्पवयीन प्रेमीयुगलाचा शोध घेणारे देऊळगावराजा पोलिसांचे पथक पनवेल येथे पोहोचले. त्यांनी या प्रेमीयुगलाला ताब्यात घेऊन २३ मे रोजी देऊळगावराजा येथे आणले. देऊळगावराजा पोलीस स्टेशनमध्ये प्रेमीयुगलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांचेही नातेवाईक परत गेले. दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना बुलडाणा विशेष न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती तपास अधिकारी सांगळे यांनी दिली.