गोरक्षण रोडवरील मालमत्ताधारकांना ‘अल्टिमेटम!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:22 AM2018-01-05T02:22:08+5:302018-01-05T02:22:20+5:30
अकोला : गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकात निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारकांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असतानाच एका बांधकाम व्यावसायिकाने रस्ता रुंदीकरणाला खोडा घातल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकात निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारकांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असतानाच एका बांधकाम व्यावसायिकाने रस्ता रुंदीकरणाला खोडा घातल्याचे समोर आले आहे. या बांधकाम व्यावसायिकाने स्वत:च्या इमारतीचा अतिक्रमित भाग न तोडण्यासाठी मनपाच्या नगररचना विभागात गावगुंड पाठवून दबावतंत्राचा वापर केल्याच्या वृत्ताची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी संबंधित मालमत्ताधारकांना अल्टिमेटम दिला आहे. येत्या १0 जानेवारीपर्यंत इमारतीचा भाग तातडीने हटवण्याचा इशारा मनपा आयुक्त वाघ यांनी दिला आहे.
शहरातील नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकपर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला जात आहे. महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतचा रस्ता अरुंद असल्यामुळे या ठिकाणी ‘बॉटल नेक’ निर्माण झाल्यास भविष्यात वाहतूक विस्कळीत होण्याची दाट शक्यता होती. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासनाने रस्त्यालगतच्या मालमत्ताधारकांच्या संमतीने जागा संपादित केली. रस्त्यासाठी जागा देण्याकरिता भाजप, शिवसेना, काँग्रेस आदी पक्षांच्या नेत्यांसह स्थानिक मालमत्ताधारकांनी पुढाकार घेतल्यामुळे रस्ता रुंदीकरण शक्य झाले.
मनपाने रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींचे मोजमाप करून रस्त्याला अडथळा ठरणारा भाग तोडण्याची कारवाई सुरू केली होती. मात्र दरम्यानच्या काळात मनपाचा प्रशासकीय कारभार विस्कळीत झाल्याचा गैरफायदा घेत गोरक्षण रोडवरील एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचा अतिक्रमित भाग तोडण्यास मनपा प्रशासनाला स्पष्ट शब्दात नकार दिला. हा प्रकार कमी म्हणून की काय, ‘त्या’ बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेच्या नगररचना विभागात गावगुंडांना पाठवून संबंधित अधिकार्यांवर दबावतंत्राचा वापर करण्यापर्यंत मजल गाठली.
हा प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गोरक्षण रोडवरील तीन मालमत्ताधारकांना तातडीने हजर राहण्याचे निर्देश दिले. तीनही मालमत्ताधारकांना इमारतींचा भाग हटवण्यासाठी १0 जानेवारीपर्यंत अल्टिमेटम देत गोरक्षण रोडचा तिढा निकाली काढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.