केबल जप्त न करण्याची कारवाई भोवली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:11 PM2020-01-08T12:11:23+5:302020-01-08T12:11:33+5:30
महापालिकेतील सत्ताधारी भाजप व प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्यांना हाताशी धरून शहरात मोबाइल कंपन्यांनी मनमानी कारभाराचा कळस गाठल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे.
अकोला: महापालिका क्षेत्रात मोबाइल कंपन्यांनी अक्षरश: धुडगूस घातल्याचे समोर आल्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांनी कारवाईचे हत्यार उपसले. शहरातील इमारती, विद्युत खांब, मनपाचे पथखांब आदींवरून टाकण्यात आलेले ‘ओव्हर हेड केबल’ जप्त करण्यास विद्युत विभागाकडून चालढकल केली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मंगळवारी आयुक्त कापडणीस यांनी विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यादरम्यान, विद्युत विभागाने गांधी रोड, पंचायत समिती परिसरातील केबल जप्त करण्याच्या कारवाईला प्रारंभ केल्याचे समोर आले.
महापालिकेतील सत्ताधारी भाजप व प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्यांना हाताशी धरून शहरात मोबाइल कंपन्यांनी मनमानी कारभाराचा कळस गाठल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. शहरवासीयांना फोर-जी सुविधा देण्याच्या नावाखाली कंपन्यांनी मनपाच्या परवानगीशिवाय सुमारे ४४ ते ४६ किलोमीटर अंतरापेक्षा जास्त खोदकाम करून फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्याची माहिती आहे. शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी स्टरलाइट टेक कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. स्टरलाइट कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याची बाब मनपाच्या तपासणीदरम्यान उघडकीस आली आहे. यावेळी स्टरलाइटने टाकलेल्या पाइपसोबतच रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने मनपाच्या परवानगीशिवाय चक्क चार पाइप टाकल्याचे तपासणीत आढळून आले. याप्रकरणी दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकांना बोलावून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी खुलासा मागितला असता, दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी समाधानकारक खुलासा सादर केला नाही. ही बाब ध्यानात घेता आयुक्त कापडणीस यांनी रिलायन्स जिओ तसेच स्टरलाइट कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये मोबाइल टॉवरला कुलूप लावण्यासह शहरातील इमारती, विद्युत खांब, मनपाचे पथखांब आदींवर टाकण्यात आलेल्या ‘ओव्हरहेड केबल’ जप्त करण्याचा समावेश आहे. ‘ओव्हरहेड केबल’ जप्त करण्यासंदर्भात विद्युत विभागाला आदेश जारी करूनही या विभागाकडून केबल जप्त करण्यास चालढकल केली जात असल्याचे समोर आले. या बाबीची दखल घेत मंगळवारी आयुक्त संजय कापडणीस यांनी विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
‘व्हेंडर’च्या विरोधात कारवाई?
शासनाच्या महाटेक प्रकल्पासाठी फोर-जी केबल टाकण्याचे काम स्टरलाइट टेक कंपनीमार्फत केले जात आहे. दुसरीकडे रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीकडूनही अनधिकृत केबल टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. दोन्ही कंपन्यांच्या कामासाठी पंकज अग्रवाल नामक एकाच ‘व्हेंडर’ची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हेंडरच्या विरोधातही कारवाई करण्याचे संकेत मनपाने दिले आहेत.
गांधी रोड परिसरात जप्तीची कारवाई
विद्युत विभागाने मंगळवारी गांधी रोड, पंचायत समिती परिसरातील मुख्य मार्गालगतचे विद्युत खांब, मनपाचे पथदिवे व काही इमारतींवरील सुमारे ८२ मीटर केबल जप्त करण्याची कारवाई केली. यावेळी काही मोबाइल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मनपाच्या कारवाईला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.