अनधिकृत २३१ धार्मिक स्थळे धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:52 AM2017-09-27T01:52:50+5:302017-09-27T01:56:29+5:30
अकोला: जिल्हय़ातील शहरी व ग्रामीण भागातील अनधिकृत २0३ धार्मिक स्थळांची बांधकामे पाडण्याची कारवाई पुढील महिन्यात करण्यात येणार असून, २८ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हय़ातील अनधिकृत २३१ धार्मिक स्थळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हय़ातील शहरी व ग्रामीण भागातील अनधिकृत २0३ धार्मिक स्थळांची बांधकामे पाडण्याची कारवाई पुढील महिन्यात करण्यात येणार असून, २८ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हय़ातील अनधिकृत २३१ धार्मिक स्थळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आणि गत ५ मे २0११ रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक व शासकीय जागेवरील अनधिकृत धार्मिक निष्कासित करण्यात येत आहेत. त्यामध्ये १९६0 पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामे निष्कासित करण्याचे अधिकार शसनाच्या राज्यस्तरीय समितीला असून, सन १९६0 नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामे निष्कासित करण्याचा अधिकार जिल्हास्तरीय समितीला आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हय़ातील सातही तालुक्यात शहरी व ग्रामीण भागातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार १ मे १९६0 नंतरची जिल्हय़ातील २0३ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई येत्या ऑक्टोबरमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे.
तसेच १९६0 पूर्वीची २८ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचा प्रस्ताव शासनाकडे (राज्यस्तरीय समिती) पाठविण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने घेतला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातील एकूण २३१ अनधिकृत धार्मिक पाडण्याची कारवाई लवकरच सुरू होणार असल्याने, जिल्हय़ातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करा;
जिल्हाधिकार्यांचे निर्देश!
जिल्हय़ातील १९६0 नंतरची अनधिकृत २0३ धार्मिक स्थळे येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत निष्कासित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी २५ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत संबंधित अधिकार्यांना दिले. तसेच १९६0 पूर्वीची अनधिकृत २८ धार्मिक स्थळे निष्कासित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीला जिल्हास्तरीय समितीचे सदस्य जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह जिल्हय़ातील पंचायत समितींचे गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
१९६0 पूर्वीची अशी आहेत २८ अनधिकृत धार्मिक स्थळे!
जिल्हय़ातील ग्रामीण व शहरी भागात १९६0 पूर्वीची पुरातन २८ अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यातील ग्रामीण भागात - ४, अकोट तालुक्यात ग्रामीण भागातील - २ व शहरी भागात - १६,तेल्हारा तालुक्यात शहरी भागात -१, बाळापूर तालुक्यात ग्रामीण भागात-१ आणि मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात -४ अनधिकृत धार्मिक स्थळांचा समावेश आहे.