अनधिकृत होर्डिंग हटवले; दंडाची आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:31 PM2019-01-15T12:31:38+5:302019-01-15T12:31:44+5:30
अकोला: निमवाडी परिसरातील लक्झरी बस स्थानक ते बाळापूर रोडवरील सत्संगपर्यंतच्या मार्गावर लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग ताब्यात घेऊन मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली.
अकोला: निमवाडी परिसरातील लक्झरी बस स्थानक ते बाळापूर रोडवरील सत्संगपर्यंतच्या मार्गावर लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग ताब्यात घेऊन मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली.
शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाला असून, रस्त्यालगत जागोजागी होर्डिंग, बॅनर, फलक व विद्युत खांबांवर जाहिरातींचे बोर्ड लावण्यात आल्याचे चित्र आहे. अनधिकृत होर्डिंगच्या संदर्भात मनपा प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा गवगवा होताच अतिक्रमण विभागाने कारवाईसाठी पुढाकार घेतला. सोमवारी सकाळी निमवाडी परिसरातील लक्झरी बस स्थानक ते बाळापूर रोड, धाबेकर फार्म हाऊससमोरील सत्संगापर्यंतच्या मार्गावर रस्त्यालगत तसेच विद्युत खांबांवर लावण्यात आलेले अनधिकृत फलक, बोर्ड हटविण्याची कारवाई मनपाने केली. मनपाच्या परवानगीशिवाय तसेच जागा दिसेल त्या ठिकाणी फलक लावण्यात आल्याप्रकरणी देवांग अॅड एजन्सीला १० हजार रुपये व संजय गोलेच्छा यांच्या अॅड एजन्सीला १० हजार रुपये दंड बजावण्यात आला. तसेच सिटी कोतवाली ते गांधी चौक, खुले नाट्यगृह ते बस स्थानकापर्यंतचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादूर, प्रवीण मिश्रा, संजय थोरात, प्रवीण इंगोले, संतोष ठाकूर तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी पार पाडली.