अनधिकृत ‘डम्पिंग ग्राऊंड’
By admin | Published: July 13, 2016 01:51 AM2016-07-13T01:51:02+5:302016-07-13T01:51:02+5:30
महापालिकेचा उफराटा कारभार : शेतकरी त्रस्त.
अकोला: नायगाव परिसरातील डम्पिंग ग्राऊंड हटवण्याचे महापालिकेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्ट आदेश असताना अद्यापही या ठिकाणी कचर्याची साठवणूक केली जात आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, आता राष्ट्रीय महामार्गालगत अनाधिकृतपणे शहरातील कचरा टाकल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी कचर्याचे ढीग पाहता मनपाचे वाहनचालक कोणाच्या आदेशाचे पालन करीत आहेत, याचा प्रशासनाने खुलासा करण्याची गरज आहे. नायगाव परिसरातील मनपाच्या जागेवर डम्पिंग ग्राऊंड निर्माण करण्यात आले. कधीकाळी हा भाग निर्मनुष्य होता. सद्यस्थितीत या भागात रहिवाशांची प्रचंड संख्या वाढली असून डम्पिंग ग्राऊंडच्या अवतीभोवती नागरिकांनी घरे उभारली आहेत. प्रभाग क्रमांक १ अंतर्गत नायगाव परिसराचा समावेश होतो. शहरातून दैनंदिन निघणार्या कचर्याचे प्रमाण पाहता नायगावमधील जागा अपुरी पडत आहे. शिवाय कचर्यामुळे या भागातील जलस्रोत दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.