शेजाऱ्यास अनधिकृत वीजपुरवठा देणेही पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:22 AM2021-09-05T04:22:57+5:302021-09-05T04:22:57+5:30

अकोला : स्वत:च्या घरासाठी मंजूर भारानुसार घेतलेल्या वीजपुरवठ्याचा गैरवापर किंवा घरातून शेजाऱ्यास वीजपुरवठा देणेही महागात पडू शकते. भारतीय ...

Unauthorized power supply to a neighbor can also be costly | शेजाऱ्यास अनधिकृत वीजपुरवठा देणेही पडू शकते महागात

शेजाऱ्यास अनधिकृत वीजपुरवठा देणेही पडू शकते महागात

Next

अकोला : स्वत:च्या घरासाठी मंजूर भारानुसार घेतलेल्या वीजपुरवठ्याचा गैरवापर किंवा घरातून शेजाऱ्यास वीजपुरवठा देणेही महागात पडू शकते. भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६नुसार हा गुन्हा ठरत असून, याअंतर्गत संबंधित ग्राहकाविरुद्ध महावितरणकडून दंडात्मक कारवाईही होऊ शकते.

अनेकवेळा विद्युत देयक थकबाकी किंवा अन्य कारणांसाठी महावितरणकडून वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येता. अशावेळी शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा जोडून घेतला जातो; मात्र नकळत घडणारा हा प्रकार अंगलट येऊ शकतो. शेजाऱ्यास असा अनधिकृतपणे वीजपुरवठा देणाऱ्यावर कारवाई केली जाऊ शकते. घराला लागूनच दुकान आहे. तिथे स्वतंत्र मीटर न घेता घरातूनच वीजपुरवठा जोडलेला असेल तरीदेखील कारवाईचे प्रावधान आहे. मंजूर भाराव्यक्तीरिक्त झालेल्या विजेच्या वापराचे मूल्यमापन करून दुप्पट युनिटचे बिल वसूल करण्याची तरतूद आहे.

महावितरणकडून वर्षभरात झालेली कारवाई

जिल्ह्यात वर्षभरात कलम १२६ अंतर्गत केवळ सात कारवाया करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत ३६,२४९ युनिटचा वापर झालेला आढळून आला. या युनिटचे मूल्यमापन करून दुप्पट दंड वसील करण्यात आला आहे. याशिवाय वर्षभरात ८७.०७ लाख रुपयांच्या ३४० वीजचोरी उघड झाल्या असून, कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आल्या आहेत.

कायदा काय सांगतो?

विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ नुसार शेजाऱ्यांकडून अनधिकृत पद्धतीने वीजपुरवठा घेणे, मंजूर वर्गवारीतून इतर वर्गवारीसाठी अनधिकृत वीज वापर केल्याप्रकरणी कारवाई केली जाऊ शकते. यासह मीटरशी छेडछाड, आकडा टाकून वीज वापर, सर्व्हिस वायर टॅप केल्यास कलम १३५ नुसार कारवाई केली जाते.

................

चोरी कळवा, दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा

२००३ मध्ये तयार झालेल्या विद्युत कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. वाढत्या वीजचोरीला आळा घालण्याकरिता ‘वीजचोरी कळवा, बक्षीस मिळवा’, ही अभिनव योजनाही हाती घेण्यात आली आहे.

याअंतर्गत वीजचोरीची माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातात. एवढेच नव्हे तर संबंधितास वीज चोराकडून वसूल करण्यात आलेल्या दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.

वीज ग्राहकाने मीटरवर मंजूर भाराएवढाच अर्थात ज्या कारणासाठी वीजपुरवठा घेतला आहे तेवढाच वीज वापर करणे अपेक्षित आहे. घरगुती वीजपुरवठ्याचा वापर दुकान, पिठगिरणीसाठी करणे किंवा शेजाऱ्याला वीजपुरवठा देणे हा कलम १२६अंतर्गत गुन्हा ठरतो. असे करणाऱ्यांवर महावितरणकडून कारवाई करण्यात येते.

- पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता, अकोला मंडळ, महावितरण

Web Title: Unauthorized power supply to a neighbor can also be costly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.