विनापरवानगी जैविक इंधन, औद्योगिक तेल विक्रीचा गाेरखधंदा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:24 AM2021-08-25T04:24:15+5:302021-08-25T04:24:15+5:30
संतोष येलकर अकोला : कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, जिल्ह्यात जैविक इंधन आणि औद्योगिक तेल विक्री केंद्र उभारण्यात आले ...
संतोष येलकर
अकोला : कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, जिल्ह्यात जैविक इंधन आणि औद्योगिक तेल विक्री केंद्र उभारण्यात आले असून, या केंद्रांमार्फत विनापरवानगी जैविक इंधन विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अवैध जैविक इंधन विक्री बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी ९ ऑगस्ट रोजी संबंधित यंत्रणांना दिला.
जिल्ह्यात विविध ठिकाणी ट्रॅक्टर, ट्रक आदी चारचाकी वाहनांसाठी बायोडिझेल (जैविक इंधन) आणि वाहनांचे इंजीन, जेसीबी मशीन आदी मशीनसाठी इंडस्ट्रीयल आइल (औद्योगिक तेल) विक्री केंद्र सुरू करण्यात आले असून, या विक्री केंद्रांमार्फत जैविक इंधन आणि औद्योगिक तेल विक्री केली जात आहे. जैविक इंधन आणि औद्योगिक तेलाची ज्वलनशीलता कमी असल्याने, त्याच्या वापरामुळे वाहनांवर विपरीत परिणाम होतो. तसेच जैविक इंधन व औद्योगिक तेल विक्री केंद्र सुरू करताना संबंधित यंत्रणांकडून आवश्यक ती परवानगी घेण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, जिल्ह्यात अवैधरीत्या सुरू असलेली जैविक इंधन व औद्योगिक तेल विक्री केंद्र बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी ९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील तहसीलदार, जिल्हा पुरवठा विभागांतर्गत निरीक्षण अधिकारी, वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षण अधिकारी, तेल कंपन्यांचे संबंधित अधिकारी व संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दिला.
अशा घेण्यात आल्या नाही परवानग्या!
तेल वितरण कंपन्यांचे विक्री केंद्र सुरू करण्यासाठी संबंधितांकडून जिल्हा दंडाधिकारी तसेच सक्षम अधिकाऱ्यांकडून आवश्यक परवाना, ना हरकत प्रमाणपत्र.
जमिनीच्या वाणिज्यिक वापरासंबंधी जिल्हा प्रशासनाकडून प्रमाणपत्र.
पेट्रोलियम आणि विस्फोटक संघटना यांचा परवाना.
राष्ट्रीय व राज्य महामार्ग प्राधिकरणकडून ना हरकत प्रमाणपत्र.
वजन व मापे विभागाकडून नोंदणीकृत.
अन्न व नागरी पुरवठा विभागाचा परवाना.
बायोफ्यूएल बोर्डाची मान्यता.
जीएसटी रजिस्ट्रेशन.
अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र.
दुकाने व आस्थापना विभागाचे नोंदणीपत्र.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र.
...........................................................................
अवैध विक्री; शासनाच्या
महसुलास चुना!
जैविक इंधन व औद्योगिक तेल विक्री केंद्रांकडून ग्राहकांना पावती दिली जात नाही. त्यामुळे इंधन व तेल विक्रीतून शासनाच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलास चुना लागत आहे.
इंधन व तेलाचे नमुनेही
तपासणीसाठी पाठविणार!
जिल्ह्यातील जैविक इंधन व औद्योगिक तेल विक्री केंद्रातून भेसळयुक्त इंधन आणि तेलाचे नमुने घेण्यात येणार आहेत. घेण्यात आलेले नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.