अकोला बसस्थानकावर वाढले अनधिकृत फेरीविक्रेते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 02:42 PM2019-04-10T14:42:32+5:302019-04-10T14:42:45+5:30
अकोला : मध्यवर्ती बसस्थानकावर गत काही महिन्यांपासून अनधिकृत फेरीवाल्यांची गस्त वाढली असून, त्यामुळे चोरी-चपाट्या वाढण्याचे संकेत मिळत आहेत.
अकोला : मध्यवर्ती बसस्थानकावर गत काही महिन्यांपासून अनधिकृत फेरीवाल्यांची गस्त वाढली असून, त्यामुळे चोरी-चपाट्या वाढण्याचे संकेत मिळत आहेत. बसस्थानकावर सीसी कॅमेऱ्यांची नजर कायम असली तरी बसस्थानकावर अनधिकृतपणे वावर करणाऱ्यांची आकडेवारीदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे.
वास्तविक पाहता, बसस्थानकावरील गाडी फलाटानिहाय बसफेरीवाल्यांची आकडेवारी निश्चित असते. अकोला मध्यवर्ती बसस्थानकावर नियमानुसार २० फेरीवाले अधिकृतपणे वावरू शकतात; मात्र रेकॉर्डवर तेवढेही अधिकृत फेरीवाले दिसत नाहीत. बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले कायम असतात. ज्यांचे ओळखपत्रदेखील बसस्थानक प्रशासनास ठाऊक नाही, असे लोक येथे रात्रंदिवस वावरत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयात तब्बल सहा महिन्यांपासून अनेक लोकांनी अर्ज केलेले आहे; मात्र त्यांच्या प्रस्तावांना अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. केवळ ११ अधिकृत परवानाधारक फेरीवाले येथे असून, इतर सर्व फेरीवाले अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रशासनाने ठरविले तर आणखी ११ फेरिवाल्यांना मंजुरी देता येते; मात्र तशी मंजुरी दिली जात नसल्याने अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासंदर्भात अकोला मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.