लग्नाचे आमिष दाखवून मामाने भाचीलाच पळविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:33 AM2017-11-16T02:33:03+5:302017-11-16T02:33:37+5:30
अकोला : सख्ख्या मामानेच रक्ताच्या नात्यातील बहिणीच्या मुलीलाच प्रेमजाळय़ात ओढून तिला अकोल्यात पळवून आणले. मामा व भाची पुण्याला पळून जाण्याच्या बेतात असतानाच, दामिनी पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सख्ख्या मामानेच रक्ताच्या नात्यातील बहिणीच्या मुलीलाच प्रेमजाळय़ात ओढून तिला अकोल्यात पळवून आणले. मामा व भाची पुण्याला पळून जाण्याच्या बेतात असतानाच, दामिनी पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली.
अलिकडच्या काळात कोणालाही नात्याचे भान राहिले नाही. नात्यालाच काळीमा फासण्याच्या घटना वाढत आहेत. पिताच आपल्या मुलीवर वाकड्या नजरेने पाहतो. तिला वासनेचे शिकार बनवितो. या घटनांमुळे नात्यांमधील विश्वास, नैतिकता, प्रेम, वात्सल्य..सर्व काही धुळीस मिळत आहे. कर्नाटक राज्यातील रामतांडा गावामध्ये राहणार्या बहिणीच्या १८ वर्षीय मुलीवरच सख्ख्या मामाने वाकडी दृष्टी टाकली. मुलीसारखी असणार्या या युवतीला मामाने प्रेमजाळय़ात ओढले. नात्याचा कसलाही विचार न करता, त्यांनी लग्न करण्याचे ठरविले; परंतु गावात राहून आपले लग्न होणार नाही, या विचाराने दोघांनी राज्याबाहेर पळून जाण्याचा निश्चय केला. मामाने आपल्या भाचीला पळवून आणले. सोलापूरला दोघे काही दिवस राहिल्यावर तेथून ते काही दिवसांपूर्वी अकोल्यात आले आणि बुधवारी दुपारी पुण्याला जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर आले. या ठिकाणी गस्तीवर असलेल्या दामिनी पथकाला हे जोडपे संशयास्पद स्थितीत दिसून आले.
दामिनी पथकातील महिला पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी दोघांची चौकशी केल्यावर मामाने त्याचे नाव, संजु देलु राठोड असल्याचे सांगत, लग्नाचे आमिष दाखवून भाचीला पळविल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्याचेही पोलिसांना कळले. पोलिसांनी मामावर प्रतिबंधात्मक कारवाई करून युवतीच्या कुटुंबियांना माहिती कळविली. युवतीला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
अश्लील चाळे करणारे प्रेमी युगुल ताब्यात
नेहरू पार्कमध्ये अश्लील चाळे करणार्या दोन प्रेमी युगलांना दामिनी पोलीस पथकाने बुधवारी सायंकाळी पकडले आणि खदान पोलीस ठाण्यात आणले. प्रेमीयुगलांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. दोन अल्पवयीन मुली व दोन युवक नेहरू पार्कमध्ये अश्लील चाळे करीत असल्याची माहिती दामिनी पोलीस पथकाला मिळाली. त्यांनी या दोन्ही जोडप्यांना ताब्यात घेतले. सदर युवक हे नाशिक येथील रहिवासी आहेत. तर युवती शहरातीलच राहणार्या आहेत. शाळेमध्ये फॉर्म भरण्यासाठी जात असल्याचे सांगून या दोनही मुली आपल्या प्रियकरांसह नेहरू पार्कमध्ये आल्या होत्या. याठिकाणी अश्लील चाळे करीत असल्याचे तेथील काही लोकांना दिसले. त्यांनी दामिनी पोलीस पथकाला माहिती दिली.