निरंकुश सायबर कॅफे!
By admin | Published: December 3, 2014 01:16 AM2014-12-03T01:16:09+5:302014-12-03T01:16:09+5:30
लोकमत स्टिंग ऑपरेशन: नेट सर्फिंगसाठी मागितले जात नाही ओळखपत्र.
अकोला- इंटरनेट कॅफेच्या माध्यमातून सायबर गुन्हे घडत असल्याचा अहवाल सीआयडीने दिला आहे. या गुन्ह्यामध्ये अकोला राज्यात आठव्या क्रमांकावर असून, याच पृष्ठभूमीवर ह्यलोकमतह्णच्या प्रतिनिधींनी मंगळवारी शहरातील इंटरनेट कॅफेवर पाहणी केली असता, नेट सर्फिंगसाठी येणार्यांची ओळख पटवून घेण्याबाबत नेट कॅफे संचालक गंभीर नसल्याचे आढळून आले. कॅफेवर नेट सर्फिंग करणार्यांवर कोणताही अंकूश नसल्यामुळे सायबर गुन्हय़ांमध्ये वाढत होत असल्याचे निदर्शनास आले.
अकोला शहरात सुमारे २५0 च्या आसपास इंटरनेट कॅफे असून, यामधील शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेट कॅफेवर ओळखपत्र मागितले; मात्र जुने शहर, जयहिंद चौक, कौलखेड, गौरक्षण रोड, तोष्णीवाल ले-आउट, मोठी उमरी, जठारपेठ, रामदास पेठ आणि रेल्वे स्थानक परिसरातील नेट कॅफेवर ओळखपत्र न मागताच संगणक उपलब्ध करून दिले जात असल्याचे आढळून आले. यावरून इंटरनेट कॅफे संचालक नेट सर्फिंगसाठी येणार्यांची ओळखपटवून घेणे आणि त्याची नोंद ठेवण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. लोकमतच्या प्रतिनिधींनी शहरातील प्रातिनिधीक स्वरुपात १५ प्रमुख इंटरनेट कॅफेची पाहणी केली. यामधील केवळ दोन इंटरनेट कॅफेवर ओळखपत्र मागण्यात आले, तर इतर १३ इंटरनेट कॅफेवर ओळखपत्र मागितले नाही. कुठल्याही नेट कॅफेवर प्रतिनिधींनी नेटसर्फिंग केल्याची नोंद करण्यात आली नाही. शहरातील ठाणेदारांना सायबर क्राइम रोखण्यासाठी नेट कॅफेवर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असले तरी पोलीसांकडून कधीही नेट कॅफे संचालकांकडून नियमांचे पालन केले जाते किंवा नाही याची तपासणी केली जात नाही.
कॅफेमध्ये ग्राहकाने प्रवेश केल्यानंतर त्याला संगणकासमोर बसू देण्याआधी त्याचे ओळखपत्र बघायला हवे. कॅफेमध्ये आलेल्या ग्राहकाने काय काम केले, याची संपूर्ण माहिती ठेवायला हवी. कॅफेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असायला हवे आदी नियमांचा समावेश आहे. मात्र, या नियमांचे पालन होत नसल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले.
दोन वर्षांत घडले ४३ सायबर गुन्हे
जिल्ह्यात गत दोन वर्षांच्या काळात तब्बल ४३ सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. २0१३ या एका वर्षात २0 सायबर गुन्हे घडले असून, २0१४ च्या नोव्हेंबरपर्यंत २३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामूळे सायबर गुन्हे आता पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. फेसबूकसारखे सोशल नेटवर्किंग व विवाह जुळविणार्या विविध सोशल साइटवर युवतींची फसगत वाढत चालली असून, याच सोशल नेटवर्किंग साइटवर विविध देवतांच्या प्रतिमा अपलोड करून धार्मिक भावना भडकावण्याचे प्रकार होत आहेत.