चालकांना सुरक्षा रक्षक पद देण्यासाठी नियमबाह्य ठराव
By admin | Published: April 15, 2016 02:12 AM2016-04-15T02:12:48+5:302016-04-15T02:12:48+5:30
शासनाचा आदेश डावलून घेतला ठराव, महामंडळाचे बडे अधिकारीही चौकशीच्या फे-यात.
सचिन राऊत/अकोला
अस्थिव्यंग, अल्पदृष्टी आणि कर्णबधिर असलेल्यांना सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये, असा शासनाचा स्पष्ट आदेश असताना राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसह बड्या अधिकार्यांनी २0१२ मध्ये नियमबाह्य ठराव घेऊन चालकांना सुरक्षा रक्षक पदावर नेमणूक देण्याचे परिपत्रक काढल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई कार्यालयाच्या परिपत्रकानंतरच अकोला विभागातील २६ चालकांना सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती देण्यात आल्याची माहिती असून, हे बडे अधिकारीही आता चौकशीच्या फ ेर्यात सापडले आहेत.
अस्थिव्यंग, कर्णबधिर व अल्पदृष्टी अशा प्रकारचे आजार असलेले चालक तसेच सुरक्षा रक्षक पदासाठीही अपात्र असून, त्यांना कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसल्याचा शासनाचा आदेश आहे; मात्र राज्य परिवहन महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक, कर्मचारी वर्ग अधिकारी (महाव्यवस्थापक), मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे प्रतिनिधी संचालक व संचालक मंडळ शासकीय यांनी २0/१२:0६:१८ या क्रमांकाचा २0 जून २0१२ रोजी ठराव घेऊन चालकांना सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती देण्याचे परिपत्रक काढण्यात आले. हे परिपत्रक एसटीच्या राज्यातील सर्वच विभागांना दिल्यानंतर विभाग नियंत्रकांनी या परिपत्रकानुसार चालकांना सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती दिल्याचे समोर आले. यासाठी अकोल्यातील विभाग नियंत्रकांनी वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन मागविले असता, त्यांनी परिपत्रकानुसार चालकांना सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती देण्याचे स्पष्ट करण्यात आले.