अघोषित भारनियमन, कृषी पंपांचा वीज पुरवठाही विस्कळीत
By admin | Published: October 7, 2014 01:57 AM2014-10-07T01:57:14+5:302014-10-07T01:57:14+5:30
अकोला जिल्ह्याचे चित्र, मात्र विक्रमी वीज पुरवठा केल्याचा महावितरणचा दावा.
अकोला : गत पंधरा दिवसांपासून राज्यात अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. कृषी पंपांचा वीज पुरवठा तासन्तास बंद असतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असताना, महावितरण मात्र ३६४.५७ लाख युनिटचा वीज पुरवठा करून विक्रम केल्याची बतावणी करीत आहे.
महावितरणने ५ ऑक्टोबर २0१४ रोजी तब्बल ३६४.५७ दशलक्ष युनिट वीज पुरवठा करण्याचा विक्रम केला. २९ सप्टेंबर २0१४ रोजी महावितरणने ३६२ दशलक्ष युनिट वीज पुरविली होती. १ ऑक्टोबर २0१४ पासून महावितरणने दसरा वगळता रोज १६000 मेगावॅटपेक्षा जास्त वीज पुरविलेली आहे. गत पंधरा दिवसांपासून राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन करण्यात येत आहे. भारनियमनाने जनता त्रस्त झाली आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. पिकांना पाण्याची नितांत गरज असताना, अतिरिक्त भारनियमनामुळे कृषिपंपांना तासन्तास वीज मिळत नाही. अनेक शेतांमध्ये सिंचनाची सोय आहे; मात्र भारनियमनामुळे पाणी असल्यावरही शेतकरी सिंचन करू शकत नाही. परिणामी त्रस्त झालेले शेतकरी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत आहेत. गत आठ दिवसात एकट्या अकोला जिल्ह्यातील दहा ते पंधरा गावातील शेतकर्यांनी महावितरणकडे भारनियमन बंद करण्याची मागणी केली. त्यासाठी काही कार्यालयांमध्ये तोडफोडही झाली आहे.
दिनांक विजेची मागणी वीज पुरवठा भारनियमन
५-१0-१४ १७,१२३ मे.वॅ. १६,७0५ मे.वॅ. ४१८ मे.वॅ.
४-१0-१४ १७,६९४ मे.वॅ. १६,७२१ मे.वॅ. ९७३ मे.वॅ.
३-१0-१४ १५,१५९ मे.वॅ. १५,0१८ मे.वॅ. १४१ मे.वॅ.
२-१0-१४ १६,२0४ मे.वॅ. १६,0९९ मे.वॅ. १0५ मे.वॅ.
१-१0-१४ १६,८१३ मे.वॅ. १६,२७८ मे.वॅ. ५३५ मे.वॅ.