१५ वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धा : अकोला १0४ धावांनी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 10:45 PM2017-12-17T22:45:55+5:302017-12-17T22:48:35+5:30
अकोला क्रिकेट क्लब मैदानावर रविवारी अकोला व भंडारा जिल्हा संघात व्हीसीए १५ वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय मुले क्रिकेट स्पर्धेतील सातवा सामना झाला. या सामन्यात अकोला संघाने १0४ धावांची आघाडी घेऊन विजय मिळविला. अंकित बगरेचा याने केल्या ४४ धावा आणि कुणाल खांडे याने काढलेल्या ४२ धावा संघाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला क्रिकेट क्लब मैदानावर रविवारी अकोला व भंडारा जिल्हा संघात व्हीसीए १५ वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय मुले क्रिकेट स्पर्धेतील सातवा सामना झाला. या सामन्यात अकोला संघाने १0४ धावांची आघाडी घेऊन विजय मिळविला. अंकित बगरेचा याने केल्या ४४ धावा आणि कुणाल खांडे याने काढलेल्या ४२ धावा संघाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.
अकोला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. ४0 षटकात ९ बाद २२९ धावांचा डोंगर अकोला संघाने रचला. सलामीचा फलंदाज कुणाल खांडे याने प्रेक्षणीय फलंदाजी करीत ४२ धावा काढल्या. अनिकेत बगरेचा यानेदेखील उत्कृष्ट फलंदाजी करीत ४४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. निशांत नाईक याने ३१ धावांचे योगदान दिले. अभिषेक सूर्यवंशी आणि प्रणय अग्रवाल यांनी प्रत्येकी २७ धावा संघाच्या खात्यात जमा केल्या. भंडारा संघाकडून शुभम चाकोले व प्रज्वल ढोले यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रियांशू गोपाळे, आदित्य जोगी, अविनाश खोब्रागडे, मासुम उईके यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात, भंडारा संघ ४५ षटकात सर्वबाद १२५ धावाच काढू शकला. अकोला संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर सलामीच्या फलंदाजांशिवाय अन्य फलंदाज फार वेळ खेळपट्टीवर खेळू शकले नाही. ऋषिकेश शेंद्रे याने उत्तम फलंदाजी करीत ४३ धावा काढल्या. डार्विन पडोळे याने २९ धावा काढल्या. ऋषिकेश व डार्विन दोघेही बाद झाल्यानंतर संघ दबावा खाली खेळला. हीच संधी साधून अकोला संघाने आपल्या गोलंदाजीचा भेदक मारा करू न भंडारा संघातील फलंदाजाला पटापट तंबूत पाठविले. अकोला संघाकडून अनुज बांडे याने भंडारा संघाचे ३ गडी बाद केले. प्रणय अग्रवालने २ गडी बाद केले. अभिषेक सूर्यवंशी, अर्जुन इंगळे, विवेक जोशी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. सामन्यात पंच म्हणून अनिल एदलाबादकर, आशीष शुक्ला यांनी काम पाहिले. नीलेश लखाडे यांनी गुणलेखन केले. सामन्याचे आयोजन विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर व जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आल्याची माहिती जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली.