‘पंदेकृवि’अंतर्गत तीन कृषी महाविद्यालयांचा प्रवेश नाकारला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:38 AM2017-08-12T02:38:07+5:302017-08-12T02:39:15+5:30
अकोला: राज्यातील सुमार दर्जाच्या खासगी सहा कृषी महाविद्यालयांना विद्यार्थी प्रवेशावर यावर्षी बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये विदर्भातील तीन कृषी महाविद्यालयांचा समावेश आहे. डॉ. पुरी समितीने दिलेल्या अहवालानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने (एमसीईएआर) हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त ९ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्यातील सुमार दर्जाच्या खासगी सहा कृषी महाविद्यालयांना विद्यार्थी प्रवेशावर यावर्षी बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये विदर्भातील तीन कृषी महाविद्यालयांचा समावेश आहे. डॉ. पुरी समितीने दिलेल्या अहवालानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने (एमसीईएआर) हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त ९ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते.
राज्यातील खासगी कृषी महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी शासनाने त्रयस्त समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पुरी आहेत. या समितीला राज्यातील काही कृषी महाविद्यालये मूल्यमापनात ‘ड’ श्रेणीत आढळली आहेत. त्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी वसतिगृह तसेच वाचनालय, प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी लागणारे जमीन फॉर्म नसल्याचे समोर आल्याने, डॉ.एस.एन. पुरी समितीने मागच्याच आठवड्यात एमसीईएआरला अहवाल सादर केला होता. त्यातील सुमार दर्जाच्या सहा महाविद्यालयांची नावे समोर आल्याने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने यावर्षी या महाविद्यालयांना बीएसी कृषी प्रथम वर्षांसाठीचा प्रवेश नाकारला आहे.
यामध्ये विदर्भातील तीन महाविद्यालयांचा समावेश असून, अकोला जिल्हय़ातील पातूर तालुक्यातील शिर्ला येथील सुमित्राबाई अंधारे, भंडारा जिल्हय़ातील केसलवाडा येथील सेवकभाऊ वाघाये कृषी महाविद्यालय आणि अमरावती जिल्हय़ातील तिवसा येथील आर.जे. देशमुख कृषी महाविद्यालयाचा समावेश आहे.
महाविद्यालयांना एक संधी
ज्या सुमार दर्जाच्या महाविद्यालयांवर बीएससी प्रथम वर्षाला प्रवेश बंदी घालण्यात आली आहे, ही एक वर्षासाठीची आहे. या महाविद्यालयांनी पुढच्या एका वर्षात दर्जा सुधारल्यास पुन्हा प्रवेश सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, बीएससी भाग २ व ३ च्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सुरू आहे.
राज्यातील कृषी महाविद्यायाच्या मूल्यमापनासाठी शासनाने माजी कुलगुरू डॉ.एस.एन. पुरी यांची एक त्रयस्त समिती नेमली होती. या समितीने तपासणीनंतर एमसीईएआरला अहवाल सादर केला असून, यामध्ये राज्यातील सहा कृषी महाविद्यालये सुमार दर्जाची आढळली आहेत. यामध्ये विदर्भातील तीन महाविद्यालयांचा समावेश असून, त्यांना यावर्षीच्या बीएससी प्रथम वर्षाच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
- डॉ. व्ही.एम. भाले,
अधिष्ठाता कृषी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.